

धुळे : पुढारी वृत्तसेवा
उसनवारीच्या पैशावरून भंगार बाजारातील मजुराचा खून करून पनवेलला पळून गेलेल्या संशयित आरोपीस अवघ्या काही तासांत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक हेमंत पाटील यांच्या पथकाने बेड्या ठोकल्या.
मूळचा उत्तर प्रदेशात राहणारा विजयकुमार गौतम नामक युवक भंगार बाजार परिसरात हमालीचे काम करीत होता. त्याचा मृतदेह धुळ्यात चाळीसगाव रोड चौफुली परिसरात आढळला. त्याच्या अंगावरील कपडे काढलेले होते. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने चाळीसगाव रोड चौफुली भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता फुटेजमध्ये एक व्यक्ती संशयितरीत्या आरामबसमध्ये दिसून आली. या गुन्ह्यात राहुल अवधराम हरजन ऊर्फ गौतम याचा सहभाग असल्याचे निदर्शनास आले. घटनेच्या दिवशी मृत विजयकुमार आणि आरोपी राहुल अमळनेर येथे असल्याची माहिती मिळाली होती. तेथून आल्यानंतर त्यांच्यात उधारीच्या पैशावरून वाद झाल्याने राहुल याने विजयकुमार याला बेदम मारहाण केली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. तत्पूर्वी अनैसर्गिक संभोग करून त्याने त्याच्याकडील पैसे काढून घेतल्याचा पोलिसांना संशय आहे. मारहाण केल्यानंतर राहुल हा तेथून पनवेलला पळाला होता. पोलिस पथकाने त्याच्या मोबाइलच्या आधारे पनवेल परिसरातील करंबोळी येथून राहुल याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केल्यानंतर या खुनाचा उलगडा झाला आहे.