नाशिक : दातली फाट्यावर वाहने सुसाट; विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडणे कठीण | पुढारी

नाशिक : दातली फाट्यावर वाहने सुसाट; विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडणे कठीण

नाशिक (दातली) : पुढारी वृत्तसेवा
सिन्नर-शिर्डी महामार्गावर रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू असून दातली फाटा येथे गतिरोधक अथवा अंडरपास नसल्याने विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागत आहे. महामार्गावर दुतर्फा गतिरोधक बसविण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. याबाबत ग्रामपंचायतीने ठराव केला आहे.

दातली फाट्यावरून सिन्नर – शिर्डी राष्ट्रीय महामार्ग जातो. महामार्गालगत असणारे केदारपूर व शहापूर ही गावे दातलीशी जोडलेली आहेत. तसेच लगतच माध्यमिक विद्यालय आहे. विद्यालयात मुसळगाव, खोपडी, भोकणी आदी गावांतून विद्यार्थी येत असतात. वाहनांची वर्दळ कायम असताना रस्ता ओलांडणे विद्यार्थ्यांसाठी कठीण झाले आहे. वेगाने येणारी वाहने चुकवित विद्यार्थी रस्ता ओलांडत असल्याने पालकांचाच जीव टांगणीला लागत असल्याचे चित्र आहे. महामार्ग ओलांडत असताना समोरच्या वाहनांचा अंदाज येत नसल्याने अपघातांचे प्रमाण वाढत आहे. चार दिवसांपूर्वी असाच एक अपघात येथे झाला. त्यात सुदैवाने मोठी हानी झाली नसली, तरी छोटा हत्ती टेम्पोचा पाठीमागील साठा वाहनाच्या धडकेत रस्त्याच्या मधोमध तुटून पडला. वाढती रहदारी लक्षात घेता माजी सरपंच ज्ञानेश्वर नागरे, विद्यमान सरपंच हेमंत भाबड यांनी भुयारी मार्ग किंवा उड्डाणपुलाची वेळोवेळी मागणी केली होती. मात्र संबंधित अधिकार्‍यांनी दखल घेतली नाही. सध्या महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात असून वाहने वेगाने धावत असतात. येथे साधे गतिरोधकही नसल्याने शालेय विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांना रस्ता ओलांडणे त्रासदायक ठरत आहे.

विद्यार्थी गटागटाने एकत्र येऊन रस्ता ओलांडतात. विद्यार्थ्यांच्या अंगावर येणार्‍या वाहनांचा वेग कमी व्हावा यासाठी महामार्गावर गतिरोधक टाकण्याची मागणी पालकांनी केली आहे. विद्यालय सुटल्यानंतर महामार्गापलीकडील विद्यार्थी एकत्र जमवून शाळेतील शिक्षक व शिपाई विद्यार्थ्यांना दुसर्‍या बाजूला नेऊन सोडत आहेत. – व्ही. के. अलगट, मुख्याध्यापक, माध्यमिक विद्यालय.

हेही वाचा:

Back to top button