नाशिक पदवीधरसाठी उद्यापासून नामनिर्देशन | पुढारी

नाशिक पदवीधरसाठी उद्यापासून नामनिर्देशन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नाशिक पदवीधर मतदारसंघाचा बिगुल वाजला आहे. निवडणुकीची गुरुवारी (दि. ५) अधिसूचना प्रसिद्ध केली जाणार असून, त्या क्षणापासून नामनिर्देशन अर्ज दाखल करता येणार आहे. त्यामुळे इच्छुक कामाला लागले आहेत. कॉग्रेसकडून विद्यमान आमदार सुधीर तांबे हेच रिंगणात उतरणार असले तरी भाजपचा उमेदवार अद्यापही ठरलेला नाही.

केंद्रीय निवडणूक आयोगाने गेल्या गुरुवारी (दि.२९) राज्यातील नाशिकसह राज्यातील दोन पदवीधर व तीन शिक्षक मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे. कार्यक्रम जाहीर हाेताच मतदारसंघाचे कार्यक्षेत्र असलेल्या पाचही जिल्ह्यांत आचारसंहिता लागू झाली आहे. गुरुवारी (दि. ५) निवडणुकीची अधिसूचना घोषित होणार असून, त्या क्षणापासून अर्ज दाखल करता येणार आहेत. अर्जांची अंतिम मुदत १२ तारखेपर्यंत असेल तर १३ जानेवारीला अर्जांची छाननी आणि १६ ला माघारीची मुदत असेल. येत्या ३० जानेवारीला सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान होणार असून, २ फेब्रुवारीला मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे.

पदवीधरकरिता अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया नाशिकरोड येथील विभागीय आयुक्तालयात होणार आहे. त्यासाठी तयारी प्रशासनाने पूर्ण केली आहे. दरम्यान, विभागातील पाचही जिल्ह्यांमधील इच्छुकांनी मागील सहा महिन्यांपासून निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. मात्र, असे असले तरी मुख्य लढत ही काँग्रेसविरुद्ध भाजप अशीच असणार आहे. काँग्रेसने आ. तांबे यांनाच पुन्हा रिंगणात उतरविण्याची तयारी केली आहे. त्याउलट भाजपमध्ये इच्छुकांची संख्या अधिक आहे. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचे बंधू राजेंद्र विखे-पाटील हे भाजपतून उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. तसेच नाशिकमधून डॉ. प्रशांत पाटील, केव्हीएन नाईक संस्थेचे सरचिटणीस हेमंत धात्रक, धुळ्यातून विसपुते हेही या उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच निवडणुकीत उमेदवार देताना भाजपची दमछाक होणार यात शंकाच नाही.

निवडणूक कार्यक्रम

५ जानेवारी : निवडणूक अधिसूचना प्रसिद्धी

१२ जानेवारी : अर्ज दाखल करायची अंतिम मुदत

१३ जानेवारी : दाखल अर्जांची छाननी

१६ जानेवारी : माघारीसाठीची मुदत

३० जानेवारी : मतदान सकाळी ८ ते दुपारी ४

२ फेब्रुवारी : मतमोजणी

हेही वाचा :

Back to top button