पुणे : पीएसआयमुळे वाचले ज्येष्ठ नागरिकाचे प्राण ! | पुढारी

पुणे : पीएसआयमुळे वाचले ज्येष्ठ नागरिकाचे प्राण !

पुणे : पुढारी वृत्तसेवा : बहात्तर वर्षांचे बबनराव भाऊसाहेब डोंगरे रस्त्याने पायी निघाले होते. त्यांना अचानक चक्कर आल्याने ते रस्त्यावरच कोसळले. डोक्याला मार लागल्याने बेशुद्ध पडले, रक्त येऊ लागले. बघ्यांची गर्दी जमली, कोणी हात लावायला तयार नाही. दरम्यान, याचवेळी तेथून कोर्टात रिमांडसाठी निघालेले पोलिस उपनिरीक्षक  सुरेश जायभाये यांनी गर्दीत जाऊन त्या वृद्धावर प्राथमिक उपचार करून तत्काळ दवाखान्यात दाखल केले. ते शुद्धीवर आल्यानंतरच ते कोर्टात हजर झाले.

ज्येष्ठ नागरिक डोंगरे हे मूळचे फुगेवाडी भोसरी येथील राहणारे. ते खडकी येथील दारूगोळा कारखान्यातून सेवानिवृत्त झाले आहेत. दोन दिवसांपूर्वी ते कामानिमित्त महापालिकेच्या परिसरात आले होते. तेथून रस्त्याने पायी चालत जात असताना, अचानक त्यांना भोवळ आली आणि ते रस्त्यावरच कोसळले. बेशुद्ध पडले. त्यांच्या डोक्याला मार लागल्याने रक्त येऊ लागले. त्यामुळे नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. परंतु, कोणी पुढे येईना. त्याचवेळी त्यांचे नशीब बलवत्तर म्हणून तेथून रिक्षातून कोर्टात रिमांडसाठी निघालेले पोलिस उपनिरीक्षक सुरेश जायभाये थांबले. त्यांनी गर्दीत जाऊन पाहिले तेव्हा ज्येष्ठ नागरिक रस्त्यावर बेशुद्ध पडलेले दिसले.

क्षणाचाही विलंब न करता, जायभाये यांनी प्राथमिक उपचार करून त्यांना शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला. थोडीशी शुद्ध आल्यानंतर जायभाये यांनी त्यांना त्याच रिक्षातून स्वतः ससून रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्यांच्यावर तत्काळ उपचार सुरू केले. काही वेळानंतर ज्येष्ठ नागरिक शुद्धीवर आले. ते शुद्धीवर येईपर्यंत जायभाये तेथेच थांबून होते. त्यानंतर जायभाये यांनी ज्येष्ठांच्या घरी संपर्क साधून त्यांच्या मुलांना ससून रुग्णालयात बोलावून घेतले. नंतरच ते आपल्या कर्तव्यावर रवाना झाले.

ज्येष्ठ नागरिकाचे पाणावले डोळे

पोलिस उपनिरीक्षक जायभाये हे गुन्हे शाखा युनिट सहा येथे कर्तव्यावर आहेत. एकीकडे कोर्टात आरोपीचे रिमांड घेणे महत्त्वाचे असतानादेखील रस्त्यावरील ज्येष्ठ नागरिकाची अवस्था पाहून त्यांनी क्षणाचाही विलंब न करता, परिस्थितीचे गांभीर्य पाहून तत्काळ मदत केल्याने त्यांचे प्राण वाचले. ज्येष्ठ नागरिक डोंगरे यांनी शुद्धीवर येताच पाणावलेल्या डोळ्यांनी जायभाये यांचे आभार मानले. अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक रजनीश निर्मल यांनी कर्तव्य बजावणारे पोलिस उपनिरीक्षक जायभाये यांचे कौतुक करत अभिनंदन केले.

Back to top button