धुळे : मजुराचा खून करणाऱ्यास पनवेलमधून अटक | पुढारी

धुळे : मजुराचा खून करणाऱ्यास पनवेलमधून अटक

धुळे; पुढारी वृत्तसेवा : उसनवारीच्या पैशावरून भंगार बाजारातील मजुराचा खून करणाऱ्या आरोपीस अवघ्या काही तासात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक हेमंत पाटील यांच्या पथकाने बेड्या ठोकल्या. मयत व्यक्ती समवेत अनैसर्गिक संबंध केल्याचा पोलिसांना संशय असून या संदर्भात वैद्यकीय तपासणीचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी आज (दि.३) पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी ऋषिकेश रेड्डी, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक हेमंत पाटील, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक आनंद कोकरे यांच्यासह तपास पथकाची उपस्थिती होती.

धुळ्यात नवीन वर्षाची सुरुवात होताच चाळीसगाव रोड चौफुली परिसरात एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. या मयत व्यक्तीच्या अंगावरील कपडे काढलेले असल्याने पोलिसांना संशय आला. या संदर्भात शहर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक हेमंत पाटील आणि शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक आनंद कोकरे यांनी समांतर तपास सुरू केला. दरम्यान या गुन्ह्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने पनवेल येथून आरोपीस बेड्या ठोकल्या.

मूळ उत्तर प्रदेशात राहणारा विजयकुमार झिनत गौतम नावाचा युवक भंगार बाजार परिसरात हमालीचे काम करीत होता. त्याचा मृतदेह संशयितरित्या आढळला. त्यामुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने तपास सुरू केला. यात चाळीसगाव रोड चौफुली भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. या फुटेज मध्ये एक व्यक्ती संशयितरित्या आरामबस मध्ये बसत असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्या फुटेजच्या आधारावर पथकाने चौकशी सुरू केली. यावेळी त्यांना गुन्ह्यात राहुल अवधराम हरजन उर्फ गौतम याचा सहभाग असल्याचे निदर्शनास आले. तपास केला असता मयत विजयकुमार आणि आरोपी राहुल हा घटना झाली त्या दिवशी अमळनेर येथे गेले होते.

त्या ठिकाणी या दोघांनी एका महिलेसोबत संबंध ठेवल्याची माहिती प्राथमिक तपासात पुढे आली आहे. तेथून आल्यानंतर या दोघांनी भरपूर मद्यपान केले. यावेळी उधारीच्या पैशावरून वाद झाल्याने राहुल याने विजयकुमार याला बेदम मारहाण केली. तत्पूर्वी अनैसर्गिक संभोग करून त्याने त्याच्याकडील पैसे काढून घेतल्याचा पोलिसांना संशय आहे. मारहाण केल्यानंतर राहुल हा तेथून निघून गेला. मात्र गंभीर जखमी असलेल्या विजयकुमार याचा मृत्यू झाला. ही बाब तपासात निदर्शनास आल्याने पोलीस पथकाने पनवेल परिसरातील करंबोळी येथून राहुल याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केल्यानंतर या खुनाचा उलगडा झाला आहे.

सहाय्यक उपनिरीक्षक संजय पाटील, दिलीप खोंडे श्रीकांत पाटील, रफिक पठाण, प्रभाकर बैसाणे, संदीप सरग, प्रकाश सोनार, योगेश चव्हाण, राहुल सानप, कमलेश सूर्यवंशी, राहुल गिरी, मयूर पाटील, तुषार पारधी, अमोल जाधव यांनी तपास केला.

हेही वाचलंत का ? 

Back to top button