दिलासादायक : गतवर्षात शेतकरी आत्महत्यांमध्ये घट;  जिल्ह्यात १० घटनांची नोंद | पुढारी

दिलासादायक : गतवर्षात शेतकरी आत्महत्यांमध्ये घट;  जिल्ह्यात १० घटनांची नोंद

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

सरलेल्या वर्षात जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्यांच्या संख्येत घट झाली असून, संपूर्ण २०२२ मध्ये १० आत्महत्यांची नोंद झाली आहे. जिल्हा प्रशासनाच्या प्रयत्नांमुळे शेतकरी आत्महत्या रोखण्यात मदत झाली आहे. गत ८ वर्षांतील ही सर्वांत नीचांकी संख्या ठरल्याने जिल्हावासीयांसाठी ही दिलासादायक बाब आहे. हा आकडा शून्यावर आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.

सततची नापिकी, वाढता कर्जाचा डोंगर आणि शेतमालाला मिळणारा कवडीमोल भाव आदी कारणांमुळे जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत शेतकरी आत्महत्यांमध्ये वाढ झाली होती. शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या हा चिंतेचा विषय बनला असताना मागील तीन वर्षांपासून जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम हाती घेतले आहेत. त्यामध्ये शासनाच्या विविध योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी यंत्रणा कार्यरत आहे. तसेच विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या मार्गदर्शनात उभारी उपक्रम राबविला जात असून, त्यामध्ये आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांना विविध योजनांआधारे जगण्यासाठी बळ मिळते आहे. प्रशासनाच्या या कार्याला गेल्यावर्षी बळ मिळाल्याचे पाहायला मिळते आहे.

जिल्ह्यात २०२२ मध्ये शेतकरी आत्महत्यांचा आकडा दहापर्यंत मर्यादित राखण्यात प्रशासनाला यश आले आहे. मालेगाव आणि चांदवडला प्रत्येकी ३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. तसेच बागलाण, निफाड, सिन्नर व दिंडोरीत प्रत्येकी १ शेतकरी आत्महत्येची नोंद झाली आहे. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांपैकी ६ जणांच्या कुटुंबाला प्रशासनाने प्रत्येकी १ लाखांची मदत मंजूर केली आहे. उर्वरित चारपैकी दोन प्रकरणे नामंजूर करण्यात आली असून, दोन प्रकरणे प्रलंबित आहेत. दरम्यान, २०१४ पासून जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्यांचा आढावा घेतल्यास २०२२ हे वर्ष मोठे दिलासा देणारे ठरले. यापूर्वी २०२७ व २०१८ मध्ये जिल्ह्यात शंभरावर शेतकरी आत्महत्यांची नोंद झाली होती. मात्र, गेल्यावर्षी सर्वांत नीचांकी दहा घटनांची नोंद झाली असून, चालू वर्षी हा आकडा शून्यावर आणण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असणार आहे.

२०२२ मध्ये झालेल्या आत्महत्या :- मालेगाव ३, चांदवड ३, बागलाण १, दिंडोरी १, सिन्नर १, निफाड १.

वर्षनिहाय शेतकरी आत्महत्या
वर्ष                            संख्या
२०१४                         ४२
२०१५                         ८५
२०१६                         ८७
२०१७                         १०४
२०१८                         १०८
२०१९                         ६९
२०२०                         ४४
२०२१                          २३
२०२२                         १०

हेही वाचा:

Back to top button