नाशिक : चालकाच्या सतर्कतेने बचावले 38 प्रवासी | पुढारी

नाशिक : चालकाच्या सतर्कतेने बचावले 38 प्रवासी

नाशिक (मनमाड)  : पुढारी वृत्तसेवा

धावत्या काळी-पिवळी मॅजिक व्हॅनने पेट घेतल्याची घटना ताजी असतानाच शनिवारी (दि. 31) दोंडाईचा येथून पुण्याला जाणाऱ्या धावत्या एसटी बसच्या इंजीनमध्ये आग लागल्याची घटना मनमाडच्या रेल्वे ओव्हर ब्रिजवर घडली. बसचालकाने समयसूचकता दाखवून तातडीने बस थांबावत प्रवाशांना बसमधून खाली उतरवल्याने 38 प्रवाशांचा जीव वाचला. इंजीनमध्ये आग लागल्यानंतर डिझेल पाइप फाटून त्यातून डिझेल गळती सुरू झाली होती, मात्र चालकाने आग आटोक्यात आणत मोठा अनर्थ टाळला.

या बाबत अधिक वृत्त असे की, दोंडाईच्या आगाराची बस (एमएच-14, बीटी-2712) दुपारी मनमाडला आल्यानंतर त्यातून काही प्रवासी उतरले. उरलेल्या 38 प्रवाशांना घेऊन ही बस पुण्याकडे जात असताना रेल्वेच्या ओव्हर ब्रिजवरून जात असताना तिच्या इंजीनमधून धूर निघून अचानक आग लागली. चालक किशोर वाघने तातडीने बस थांबवून सर्व प्रवाशांना खाली उतरविले. वाघ आणि आणि वाहक व्ही. सी. पाटील यांनी बसमधील फायर बॉटलने आगीवर तत्काळ नियंत्रण मिळविले. इंजीनमध्ये आगीनंतर तिचा पाइप फाटून त्यातून डिझेल गळतीदेखील सुरू झाली होती. मात्र. चालकाने दाखविलेल्या समयसूचकतेमुळे सर्व 38 प्रवाशांचा जीव वाचलाच, शिवाय बसदेखील खाक होण्यापासून वाचली आणि मोठा अनर्थ टळला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर मनमाड एसटी डेपोचे आगारप्रमुख लाड वंजारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन प्रवाशांना दिलासा दिला. शिवाय त्यांच्यासाठी दुसऱ्या बसची व्यवस्था केल्यानंतर सर्व प्रवासी पुण्याकडे रवाना झाले.

हेही वाचा:

Back to top button