Nashik : लाचखोरांवरील कारवाईत नाशिक राज्यात दुसरे | पुढारी

Nashik : लाचखोरांवरील कारवाईत नाशिक राज्यात दुसरे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने राज्यभरात झालेल्या लाचखोरांवरील कारवाईत राज्यात नाशिक दुसऱ्या स्थानी आले आहे. नाशिक परिक्षेत्रात वर्षभरात १२५ सापळ्यांमध्ये १७५ लाचखोर व्यक्तींना पकडण्यात आले असून, यात नऊ खासगी व्यक्ती आढळल्या आहेत. राज्यात सर्वाधिक कारवाई पुणे परिक्षेत्रात झाली असून, त्यात १५५ सापळ्यांमध्ये २२३ लाचखोर जाळ्यात सापडले आहेत.

नाशिक परिक्षेत्रातील नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १ जानेवारी ते ३० डिसेंबर २०२२ या कालावधीत १२५ सापळ्यांमध्ये १७५ लाचखोरांना पकडले आहे. त्यात सर्वाधिक लाचखोरीच्या कारवाया पोलिस विभागात झाल्या आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत पोलिस विभागात ३०, महसूल विभागात २१, जिल्हा परिषद, पंचायत समिती १५, महावितरण कंपनीत १०, शिक्षण विभागात चार, आदिवासी विकास विभागात चार सापळे रचून लाचखोरांना पकडले आहे. तर नऊ खासगी व्यक्तींनाही लाच घेताना किंवा मागताना पकडले आहे. त्याचप्रमाणे चार अन्य भ्रष्टाचाराचे गुन्हे दाखल केले असून, त्यात १४ शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.

वर्ग तीन सर्वाधिक लाचखोर

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईनुसार, परिक्षेत्रात पकडलेल्या लाचखोरांमध्ये सर्वाधिक ९२ लाचखोर वर्ग तीनमधील आहेत. त्या खालोखाल वर्ग दोनमधील २५ अधिकारी लाचखोर होते. तर वर्ग एक व चारमध्ये प्रत्येकी १०-१० लाचखोर अधिकारी व कर्मचारी आहेत. तसेच इतर ३८ लोकसेवक व खासगी व्यक्ती लाच घेताना किंवा मागताना जाळ्यात सापडले आहेत.

परिक्षेत्रातील मोठ्या कारवाई

नंदुरबार येथे मार्च महिन्यात महसूल विभागातील उपविभागीय अभियंता, सहायक अभियंता व खासगी व्यक्तीस चार लाख रुपयांची लाच घेताना पकडले.

जून महिन्यात सातपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातील प्रादेशिक अधिकारी व क्षेत्र अधिकाऱ्यास ३० हजार रुपयांची लाच घेताना पकडले.

ऑगस्ट महिन्यात जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथे महावितरण कार्यालयातील सहायक अभियंत्यास सहा लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी अटक केली.

आरोग्यसेवेतील उपसंचालक कार्यालयातील मुख्य प्रशासकीय अधिकाऱ्याने ऑगस्ट महिन्यात २० हजार रुपयांची लाच घेतली होती.

ऑगस्ट महिन्यातच आदिवासी विकास विभागातील सार्वजनिक बांधकामच्या कार्यकारी अभियंत्यास २८ लाख ८० हजार रुपयांची लाच घेताना पकडले. 

हेही वाचा :

Back to top button