कोरेगाव भीमा : सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात; जिल्हाधिका-यांनी घेतला नियोजनाचा आढावा | पुढारी

कोरेगाव भीमा : सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात; जिल्हाधिका-यांनी घेतला नियोजनाचा आढावा

कोरेगाव भीमा (ता. शिरूर); पुढारी वृत्तसेवा : पेरणे फाटा येथे रविवारी दि. 1 जानेवारी 2023 या शौर्यदिनी आयोजित विजय रणस्तंभ अभिवादन सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख आणि पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी विजयस्तंभ परिसराला भेट देऊन सोहळ्याच्या नियोजनाचा आढावा घेतला. पोलिस सहआयुक्त संदीप कर्णिक, अतिरिक्त पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा, मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, उपविभागीय अधिकारी संजय आसवले, तहसीलदार किरण सुरवसे आदी उपस्थित होते.

या वेळी अभिवादनासाठी येणार्‍या अनुयायांसाठी पिण्याच्या पाण्याचे टँकर, शौचालय, वाहनतळ, रुग्णवाहिका, अग्निशमन वाहन तसेच आरोग्य विभागाच्या वतीने औषधे, मास्क आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. एकूणच सर्व विभागांच्या वतीने नियोजन करण्यात येत आहे. तसेच शनिवारपर्यंत सर्व तयारी पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सर्व अधिकार्‍यांना दिल्या.

विजय रणस्तंभास अभिवादन करण्यासाठी येणार्‍या अनुयायांची संख्या लक्षात घेता अतिरिक्त अधिकारी व कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. राज्य राखीव दलाच्या 7 तुकड्या बंदोबस्तासाठी नेमण्यात आलेल्या आहेत. पोलिस विभागाच्या वतीने उत्तम पद्धतीने बंदोबस्त करण्यात येणार असून, नागरिकांनी पोलिस प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन पोलिस आयुक्त रितेशकुमार यांनी केले आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण, कार्यकारी अभियंता अजय भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरात सुविधा निर्माण करण्यात येत असून, विजय रणस्तंभ फुलांनी सजविण्यात येत आहे. चारही बाजूंनी बॅरिकेड तसेच महिलांसाठी हिरकणी कक्ष आणि स्वतंत्र तात्पुरत्या स्वच्छतागृहांची व्यवस्था करण्यात आली असून, परिसरात नियंत्रण कक्ष उभारण्यात आला असून पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे.

फुलांची आकर्षक सजावट
205 व्या शौर्यदिनी ऐतिहासिक विजय रणस्तंभास मानवंदना देण्याच्या कार्यक्रमाच्या नियोजनाची तयारी जोरात सुरू आहे.
आता ऐतिहासिक विजय रणस्तंभाची फुलाने सजावट करण्यात येत आहे. कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक विजय रणस्तंभ परिसर तब्बल वीस गुंठे जागेमध्ये असून, तो 75 फूट उंच आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीच्या माध्यमातून कोरेगाव भीमा विजय रणस्तंभ सेवा संघाच्या माध्यमातून देखरेख झाली असून, सजावटीची तयारी सुरू करण्यात आली आहे.

पाण्याच्या सहाय्याने विजय रणस्तंभ धुवून स्वच्छ करत सटावटीच्या तयारीस सुरुवात करण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणात हा विजय रणस्तंभ फुलांनी सजविण्यात येत आहे. नेहमीप्रमाणे फुलांनी विजय रणस्तंभाची सजावट सुरू असताना या वेळी तेथे फुलांनी तिरंगा रंग देत, 205 वा शौर्यदिन असे अक्षर काढून मध्यभागी महार रेजिमेंटचा सिम्बॉल लावण्यात आला आहे. तर स्तंभाची फुलांची सजावट पूर्ण होताच स्तंभाला काही प्रमाणात विद्युत रोषणाई करणार असल्याचे कोरेगाव भीमा विजय रणस्तंभ सेवा संघाचे अध्यक्ष सर्जेराव वाघमारे यांनी सांगितले.

अफवा पसरवणार्‍यांवर कठोर कारवाई; पोलिस सहआयुक्त संदीप कर्णिक यांची माहिती
विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने पुणे शहर पोलिस सहआयुक्त संदीप कर्णिक यांनी 31 डिसेंबर रोजी मध्यरात्रीपासून 2 जानेवारी 2023 रोजी मध्यरात्रीपर्यंत कलम 144 प्रमाणे प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.
विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव भीमा, पेरणे फाटा परिसरात इंस्टाग्राम, व्हॉट्सअ‍ॅप, टि्वटर, फेसबुक आदी समाजमाध्यमांद्वारे अफवा, जातीय द्वेष पसरवणारे खोटे संदेश, खोटी माहिती पोस्ट करणार्‍यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.

अशाप्रकारचे संदेशाची जबाबदारी संबंधित पोस्ट करणारी व्यक्ती आणि ग्रुप अ‍ॅडमिनची असेल. पुणे शहर आयुक्तालयामधील गावांमध्ये स्थानिक प्रशासन व पोलिसांच्या लेखी परवानगीशिवाय सार्वजनिक ठिकाणी बॅनर, फ्लेक्स, होर्डिंग लावण्यास प्रतिबंध राहील. या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय दंड विधान संहिता कलम 188 प्रमाणे शिक्षेस पात्र राहाणार आहे.

विजयस्तंभासाठी विणल्या फुलांच्या माळा
कोरेगाव भीमा विजयस्तंभ सजावटीसाठी पुण्याच्या माजी महापौर रजनी त्रिभुवन व महिला कार्यकर्त्यांनी फुलांच्या माळा तयार केल्या. फुलांच्या माळा तयार करताना पुण्यातील सर्वपक्षीय आंबेडकरी चळवळीतील महिलांनी जात्यावरील भीमगीते गायली, अशी माहिती कोरेगाव भीमा विजयस्तंभ शौर्य दिन समन्वय समितीचे अध्यक्ष राहुल डंबाळे यांनी दिली. सुवर्णा डंबाळे, संगीता आठवले, अनिता चव्हाण, विशाखा गायकवाड आदी उपस्थित होते.

Back to top button