Mini Olympics : नाशिकमध्ये २ ते ५ जानेवारी दरम्यान योगा, सायकल स्पर्धा | पुढारी

Mini Olympics : नाशिकमध्ये २ ते ५ जानेवारी दरम्यान योगा, सायकल स्पर्धा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनमार्फत राज्यात विभागीय स्तरावर मिनी ऑलिम्पिक (Mini Olympics) स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असून नाशिकमध्ये २ ते ५ जानेवारी या काळात योगा आणि सायकल स्पर्धा घेण्यात येणार आहे. मिनी ऑलिम्पिकच्या पार्श्वभूमीवर शहरातून शुक्रवारी (दि.३०) क्रीडा ज्योत रॅली काढण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी पत्रकार परिषदेत दिली.

महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनमार्फत राज्यात नविन खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे, यासाठी विविध क्रीडा स्पर्धांचे आयोेजित केल्या जातात. त्याअंतर्गत २ ते १२ जानेवारी याकाळात पुणे येथे शिवछत्रपती क्रिडापीठात मुख्य स्पर्धा होणार आहेत. विभागीय स्तरावर नाशिक, नागपुर, जळगाव, मुंबई, अमरावती, औरंगाबाद येथे विविध स्पर्धा घेण्यात येतील. नाशिक येथे २ ते ५ जानेवारी याकाळात पंचवटीमधील विभागीय क्रीडा संकुल येथे योगा स्पर्धा होणार आहे. त्यात १३० स्पर्धक सहभागी होतील.

तसेच शिर्डी-सिन्नर समृध्दी महामार्गावर पाथरे गावानजीक सायकलिंग रोडरेस होणार असून त्यात प्रत्येकी ६६ मुले-मुलींची नोंदणी केली आहे. सायकल रोडरेस ही ३०, ४० व ६० किमी गटात होणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. स्पर्धेतील विज्येत्यांना ५ जानेवारी राेजी सायंकाळी पारितोषिक देऊन सन्मानित केले जाणार आहे. मिनी ऑलिम्पिक स्पर्धांच्यासाठी राज्याच्या प्रत्येक विभागातून क्रीडा ज्योत रॅली आयोजित करण्यात आली आहे. नाशिकमध्ये शुक्रवारी (दि.३०) सकाळी ७ ला विभागीय क्रिडा संकुलातून रॅलीचा प्रारंभ होणार आहे. शहर-परिसरातून ती मार्गक्रमण करेल. याप्रसंगी जिल्हा क्रिडा अधिकारी अविनाश टिळे, महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक संघटनेचे विभागीय प्रतिनिधी राजेंद्र निबांळते उपस्थित होते.

विविध शाळांचा सहभाग

पंचवटीमधील विभागीय क्रिडा संकुलापासून क्रीडा ज्योत रॅली निघणार असून आडगाव नाका, पंचवटी कारंजा, रविवार कारंजा, यशवंत व्यायामशाळा, मेहेर सिग्नल, अशोकस्तंभ, केटीएचएम महाविद्यालय, जुना गंगापूर नाका, कॅनडा कॉर्नर, राजीव गांधी भवन, टिळकवाडीमार्गे हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान येथे रॅलीचा समारोप होणार आहे. या रॅलीत विविध शाळांचे सुमारे ७०० विद्यार्थी सहभागी होतील, अशी माहिती अविनाश टिळे यांनी दिली.

हेही वाचा :

Back to top button