धुळे : पुढारी वृत्तसेवा
खान्देश साहित्य संघ महाराष्ट्र आयोजित 6 वे अखिल भारतीय आहिराणी साहित्य संमेलन यंदा धुळ्यात नूतन वर्षी दि. 21 व 22 जानेवारी रोजी घेण्यात येणार आहे. त्यासाठी बर्वे स्मृती येथे संपर्क कार्यालय सुरू केले असून या कार्यालयात झालेल्या बैठकीत संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ आहिराणी साहित्यिक रमेश बोरसे यांची निवड करण्यात आली. तर स्वागताध्यक्षपदी अश्विनी कुणाल पाटील यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. दरम्यान, आहिराणी साहित्य संमेलनात आहिराणी साहित्यिकांची मांदियाळी जमणार आहे.
यंदा धुळ्यात हिरे भवन येथे दोन दिवसीय अखिल भारतीय आहिराणी साहित्य संमेलन होत आहे. त्याअनुषंगाने येथील संपर्क कार्यालयात घेण्यात आलेल्या बैठकीत खान्देश साहित्य संघाचे केंद्रीय अध्यक्ष प्रा. डॉ. सदाशिव सुर्यवंशी यांनी संमेलनाबाबत माहिती देतांना सांगितले की, आहिराणी साहित्यिक रमेश बोरसे हे सेवानिवृत्त हे निवृत्त माध्यमिक शिक्षक असून त्यांनी स्तंभलेखनाच्या माध्यमातून साहित्य लेखनाला सुरुवात केली. काव्य, कथा, ललित अशा विविध साहित्य प्रकारातून त्यांनी अविरातपणे लिखाण केले आहे. आहिराणी साहित्याला वाहिलेले पहिले आहिराणी खानदेशनी वानगी हे त्रैमासिकही ते नियमितपणे चालवित असतात. आहिराणी भाषेचा प्रचार, प्रसार आणि जोपासनेसाठी त्यांनी स्वत:ला वाहून घेतले आहे. एकूण कारकिर्दीचा विचार करुन रमेश बोरसे यांचा आहिराणी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली आहे.
तसेच संमेलन स्वागताध्यक्षपदी अश्विनी पाटील यांच्याही नावाची घोषणा करण्यात आली असून ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांच्या त्या पत्नी आहेत. खान्देश आणि आहिराणी भाषेला न्याय मिळवून देण्यासाठी माजी मंत्री रोहिदास पाटील, आ. कुणाल पाटील यांनी नेहमीच प्रयत्न केले आहेत. नाशिक आणि धुळे येथे झालेल्या आहिराणी साहित्य संमेलनाच्या यशस्वी आयोजनात आ. पाटील यांचा मोलाचा सहभाग होता. दरम्यान आहिराणी संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी महिलेला संधी दिल्याने आयोजकांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. आ. पाटील यांच्यासोबत अश्विनी पाटील यांचे राजकारण आणि समाजकारणात सक्रीय सहभाग असतो. बचतगट, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका अशा क्षेत्रात त्यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. त्यांच्या स्वागताध्यक्षपदी नियुक्तीचे स्वागत करण्यात येत आहे. आहिराणी साहित्य संमेलनाच्या संपर्क कार्यालयात पार पडलेल्या बैठकीला प्राचार्या रत्ना पाटील, शाहिर श्रावण वाणी, नुतन अध्यक्ष रमेश बोरसे, प्रा.रमेश राठोड, रंजन खरोटे, प्रा. डॉ. सदाशिव सुर्यवंशी, प्रभाकर सुर्यवंशी, विश्राम बिरारी, रवींद्र पानपाटील, चुडामण पाटील, प्रविण पवार, आकाश महाले, अॅड. कविता पवार, नाजनीन शेख, कमलेश शिंदे, डॉ. रमेश जैन, एस. जे. बोरसे, श्रीकृष्ण बेडसे, के. एन. साळुंखे, अशोक महाले, अॅड. सागर तापकिरे, प्रा. अशोक शिंदे आदी साहित्यिक उपस्थित होते.