पुणे: ‘येथे कचरा टाकणाऱ्या ग्रामस्थांच्या घरावर म्हसोबा कोप करणार’, कोरेगाव भीमा ग्रामपंचायतकडून नागरिकांच्या भावनेचा छळ | पुढारी

पुणे: 'येथे कचरा टाकणाऱ्या ग्रामस्थांच्या घरावर म्हसोबा कोप करणार', कोरेगाव भीमा ग्रामपंचायतकडून नागरिकांच्या भावनेचा छळ

पुणे: कोरेगाव भीमा (ता.शिरूर) हे गाव शिरूर तालुक्यातील एक महत्त्वाचे गाव समजले जाते. परंतु स्वच्छतेच्या दृष्टीने या गावात योग्य मोहीम न राबवता त्यास चुकीचे वळण दिले जात असल्याचा प्रकार समोर येत आहे. कचरा प्रश्न गंभीर होत असतानाच उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांना रोखण्यासाठी ठीक ठिकाणी ग्रामपंचायत तर्फे फक्त फलक लावण्यात आले आहेत. त्यावर स्पष्टपणे लिहिले आहे की, कचरा टाकणाऱ्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल. या ठिकाणी सी.सी. टि. व्ही कॅमेरे बसविले आहेत. मात्र हे साफ खोटे असून कुठेही कॅमेरे बसविले नसल्याचे स्पष्ठ होत आहे.

एवढेच नाही तर कचरा टाकणाऱ्याच्या घरावर म्हसोबा कोप करेल,अशा प्रकारे चुकीचे व ग्रामस्थांची मने दुखावली जातील, असे फलकही झळकत आहेत. असे गैर वर्तन करून ग्रामपंचायत नागरिकांच्या भावनेशी खेळ करत असल्याचे दिसून येत आहे. कचऱ्याच्या ठिकाणी म्हसोबा देवाचा फोटो लावल्याने भक्तांची मने दुखावली जात असून नाराजी व्यक्त केली जात आहे. देवतांचे फोटो पवित्र अशा ठिकाणी लावायला हवे. ते कचऱ्याच्या ठिकाणी लावले गेले असल्याने ग्रामपंचायत भाविकांच्या व ग्रामस्थांच्या भावनेचा छळ करत असल्याचा आरोप होत आहे.

पंढरीनाथ नगर येथील रस्त्यांच्या बाजूने अनेक कचऱ्याचे व्यावसायिक स्थायिक झाले आहेत. त्यांच्याकडून रस्त्याच्या बाजूने प्लास्टिक कचरा फेकला जात आहे तर काही ठिकाणी रस्त्याच्या बाजूलाच ढीग साठवले आहेत. रात्रीच्या वेळी प्लास्टिक कचरा रस्त्याच्या बाजूने पेटविला जात आहे. त्यामुळे वायुप्रदूषण मोठ्या प्रमाणात होत आहे. खोटे फलक लावून नागरिकांच्या भावनेशी खेळण्यापेक्षा या व्यावसायिकांवर कारवाई का केली जात नाही?, त्यांच्याकडून ग्रामपंचायतीतील काही लोकांना हफ्ते चालू आहेत का? असे प्रश्न सर्व सामान्य नागरिकांना पडत आहेत.

कचरा टाकण्यासाठी एक जागा तयार करून दिली तर कचरा प्रश्न सुटेल किंवा यावर आणखी काय उपाय केले जातील म्हणजे कचरा प्रश्न सुटेल या उपायांवर विचार करण्या ऐवजी खोटे फलक उभे करून ग्रामस्थांच्या भावनेशी खेळले जाण्याचे प्रकार कोरेगाव भीमा येथे पाहण्यास मिळत आहे. त्यामुळे ग्रामस्थ नाराजी व्यक्त करू लागले आहेत.

Back to top button