सुपा : पुढारी वृत्तसेवा : पारनेर तालुक्यातील सुपा ठाण्याच्या पोलिस कर्मचार्यांतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले आहेत. दोघा कर्मचार्यांकडून सुरू असलेल्या त्रासातून हवालदाराचा बीपी वाढल्याने त्यांना उपचारार्थ हॉस्पिटलला दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणाची नोंद स्टेशन डायरीत करण्यात आल्याने जिल्हा पोलिस दलात खळबळ उडाली आहे. बेलवंडीचे सहाय्यक फौजदार सुनील मोरे, राहुरीचे हवालदार भाऊसाहेब आघाव यांनी कर्मचारी, वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून जगाचा निरोप घेतल्याच्या घटना विस्मृतीत जात नाही, तोच भिंगार पोलिस ठाण्यातील दोघा कर्मचार्यांची थेट ठाण्यातच धरपकड झाली होती. आता सुपा पोलिस ठाण्यातही अंतर्गत धूसफूस समोर आली आहे.
खंडेराव शिंदे असे बीपी वाढून हॉस्पिटलला अॅडमिट झालेल्या हवालदाराचे नाव आहे. पारनेर येथे लॉकअप गार्डवर ड्युटीवर जात असताना त्यांच्या छातीत अचानक दुखायला लागले, रक्तदाब वाढला. पोलिस ठाण्याच्याच एका कर्मचार्याने त्यांना वेळीच रुग्णालयात दाखल केल्याने अनर्थ टळला. रविवारी सकाळी ही घटना घडली.
हवालदार खंडेराव शिंदे हे साडेतीन वर्षांपासून पारनेर तालुक्यात पोलिस सेवेत आहेत. स्टेशन डायरीतील नोंदीनुसार हवालदार अमोल धामणे व हवालदार अशोक मरकड हे त्यांना एक वर्षापासून मानसिक त्रास देत असल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे. जीवाचे बरे-वाईट झाल्यास या दोघांना जबाबदार धरण्यात यावे, अशी नोंद डायरीला घेण्यात आली आहे. या त्रासातूनच हवालदार शिंदे यांचा अचानक बीपी वाढला तसेच त्यांच्या छातीत वेदना सुरू झाल्या. प्रसंगावधान सहकारी पोलिस कर्मचार्याने त्यांना तत्काळ खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
साडेतीन वर्षापासून सुपा येथे पोलिस सेवेत आहे. मला होणार्या मानसिक त्रासाची कल्पना पोलिस निरीक्षक गोकावे यांना काही दिवसांपूर्वी दिलेली आहे. गोकावे यांचा त्रास नाही, पण त्रास देणारे दोघे त्यांचेही ऐकत नाहीत. माझ्यासह अनेकांना 'त्या' दोघांचा त्रास सुरू आहे.
– खंडेराव शिंदे, हवालदार, सुपा
खंडेराव शिंदे यांना छातीत दुखत असल्यामुळे दवाखान्यात आणण्यात आले. बी.पी वाढल्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. औषधोपचार करून त्यांना विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे.
-बाळासाहेब पठारे, उपचार करणारे डॉक्टर
निवडणुका, मोर्चे बंदोबस्त, रास्तारोको, अपघात, दरोडा, गोपनीय माहितीसाठी ड्युटी लावताना पोलिसांचे मानसिक संतुलन बघितले जाते. तसा असा अलिखित नियमच आाहे. पण, सुपा पोलिस ठण्यात मात्र तोंड पाहून ड्युटी लावली जाते. त्याच त्रासातून हवालदार शिंदे यांना त्रास झाल्याची चर्चा पोलिस दलात कानोसा घेता ऐकू येते.