आमदार कोकाटे झाले उद्विग्न : अधिवेशनात शेतकरी, कामगारांचे प्रश्न कुठे? | पुढारी

आमदार कोकाटे झाले उद्विग्न : अधिवेशनात शेतकरी, कामगारांचे प्रश्न कुठे?

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा
गेला आठवडाभरापासून नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू आहे. मात्र जणू राज्यातील जनतेचे सर्व प्रश्न सुटले आहे, अशा अविर्भावात सत्ताधारी वागत आहेत. अधिवेशनात कोणाचा मृत्यू कसा झाला? महापुरुषांचे अपमान, राजकीय नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप हेच विषय सुरू आहेत. शेतकरी, कामगारांचे प्रश्नच कुठे? असा उद्विग्न सवाल आमदार माणिकराव कोकाटे यांनी केला आहे.

गेल्या आठ दिवसांपासून नागपूर येथे विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. मात्र विरोधी पक्ष आणि सरकार यांच्यामध्ये कुरघोडीचे राजकारण पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे दिशा सालियन मृत्यू प्रकरण त्याचबरोबर इतर नेत्यांची प्रकरणे उकरून त्यावर चर्चा झडत आहेत. त्यामुळे शेतकरी, पीकविमा, राज्यातील रस्ते, पाणी इतर विषय मागे पडले आहेत. या अधिवेशनाच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त करत राष्ट्रवादीचे सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे नाशिकमध्ये परतले आहेत. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना या सगळ्या बाबींबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. आमदार कोकाटे यांनी अधिवेशनाच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त केली. अधिवेशनात शेतकरी नुकसानभरपाई, पीकविमा, वीजबिल, रस्ता, पाणी आदी जनतेच्या समस्यांवर चर्चाच होत नसेल, तर तिथे थांबून काय उपयोग? अशा शब्दांत त्यांनी रोष व्यक्त केला. पुरवणी मागण्या मंजुरीसाठीच आम्ही सपोर्ट करायचा का? ही बाब योग्य नाही. त्यामुळे आपण नाशकात परतल्याचे ते म्हणाले. आमदार कोकाटे यांच्या भूमिकेचे पडसाद अधिवेशनात उमटण्याची चिन्हे आहेत.

करमणुकीसाठी अधिवेशनात बसायचे का?
आम्ही प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करतो, मात्र कोणी ऐकून घ्यायला तयार नाही. रात्रंदिवस काबाडकष्ट करणार्‍या शेतकर्‍यांच्या प्रश्नावर चर्चा करायला सरकारला वेळ नाही. आणि ते त्या विषयावर गंभीरही नाहीत. त्यामुळे फक्त करमणुकीसाठी अधिवेशनात बसायचे का? हे माझ्या बुद्धीला पटत नाही. उद्विग्न अवस्थेत आपण तेथून काढता पाय घेतल्याचे आमदार कोकाटे यांनी नमूद केले.

हेही वाचा:

Back to top button