Nashik : भाविक, पर्यटकांनी गजबजली पंचवटी, सुट्यांमुळे गोदाघाटावर गर्दी | पुढारी

Nashik : भाविक, पर्यटकांनी गजबजली पंचवटी, सुट्यांमुळे गोदाघाटावर गर्दी

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा

वर्षअखेर व नाताळ सुटीमुळे पंचवटीतील सर्वच धार्मिक व पर्यटन क्षेत्र गर्दीने गजबजले आहे. कोरोनामुळे करण्यात आलेले निर्बंध काही प्रमाणात शिथिल केल्यानंतर धार्मिक स्थळे खुली करण्यात आली होती. सुरुवातीला या स्थळांवर फारशी गर्दी होत नव्हती. मात्र, नाताळच्या सुट्यांमुळे राज्यासह इतर राज्यांतूनही भाविक आणि पर्यटकांचा ओघ वाढला आहे. रामकुंड, गोदाघाट, कपालेश्वर, श्री काळाराम मंदिर, सीतागुंफा, सांडव्यावरची देवी मंदिर, तपोवन या धार्मिक स्थळांवर चार ते पाच दिवसांपासून मोठ्या प्रमाणात गर्दी वाढल्याने परिसर गजबजला आहे.

कोरोना काळातील निर्बंधांमुळे मंदिरे बंद होती तसेच अनेक बंधनेदेखील लावण्यात आली होती. त्यावेळी धार्मिक पर्यटनस्थळे सुनी झाली होती. रामकुंडावर होणारे धार्मिक विधी वगळता, भाविकांची व पर्यटकांची वर्दळ कमी झाली होती. गेल्या दोन वर्षांत मोजक्याच दिवशी गर्दीत वाढ झालेली दिसली होती. मात्र, आता नाताळच्या सुट्या असल्याने गर्दीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, चीनमध्ये कोरोनाने डोके वर काढल्याने पुन्हा एकदा कोरोनाचा शिरकाव होतो की काय, या भीतीपोटी काही भाविक काळजी घेत असल्याचे दिसून आले. मास्कचा वापर आणि सुरक्षित अंतर ठेवून मंदिरात दर्शनासाठी जात होते. रामकुंडावर स्नान करतानाही अशीच काळजी घेतली जात असल्याचे जाणवले. स्थानिक भाविकांपेक्षा परराज्यातून येणाऱ्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. काही शाळा-महाविद्यालयांच्या सहलीदेखील येत असल्याने विद्यार्थ्यांचीही मोठी संख्या दिसून आली. या पर्यटकांच्या वाहनांची संख्या वाढल्याने रामकुंड, म्हसोबा पटांगण, गौरी पटांगण, कपूरथळा, रोकडोबा या ठिकाणची पार्किंग फुल्ल झालेली होती.

गर्दीच्या ठिकाणावरून तपोवनातील मोकळ्या व निसर्गरम्य वातावरणाकडे पर्यटक वळत होते. येथील बडा लक्ष्मीनारायण मंदिर, श्रीराम पर्णकुटी, सर्वधर्म मंदिर, लक्ष्मण मंदिर, शुर्पनखा मंदिर येथे दर्शन करून कपिला संगमावरच्या खडकावर फेरफटका मारताना व रामसृष्टी उद्यानात पर्यटकांची वर्दळ अधिक दिसून आली. या उद्यानाच्या हिरवळीवर थांबणाऱ्यांची गर्दी वाढल्याने हे उद्यान गजबजून गेले आहे. पर्यटकांवर अवलंबून असणाऱ्या अनेक व्यावसायिकांनी त्यांचे व्यवसाय थाटले असून, कित्येक दिवसांपासून ठप्प झालेल्या या व्यवसायांना या गर्दीच्या निमित्ताने चालना मिळाल्याने व्यावसायिकांनी समाधान व्यक्त केले.

पर्यटन विकासाच्या दृष्टीने नियोजनशून्य कारभार

नाशिक धार्मिकस्थळ असल्याने भाविकांची सुट्यांमध्ये नेहमीच गर्दी होत असते. मात्र, पर्यटनाच्या दृष्टीने शहरात मनपाच्या वतीने कोणतीही पावले उचलली जात नसल्याचे गेल्या अनेक वर्षांत दिसून आले आहे. शहराचा विकास करताना पर्यटनाच्या दृष्टीने कामे कधीच केली जात नाही. ही शोकांतिका असून, भविष्यात तरी याबाबतीत मनपा व पर्यटन विकास महामंडळाने योग्य ती पावले उचलावी, अशी अपेक्षा भाविक व्यक्त करीत आहेत.

श्री काळाराम मंदिरात मास्क सक्ती
पुन्हा एकदा कोरोनाचा शिरकाव होण्याची शक्यता वर्तविली जात असल्याने त्या दृष्टीने श्री काळाराम मंदिर संस्थानच्या वतीने मंदिर परिसरात कोरोनात काय काळजी घ्यावी याबाबत जनजागृतीपर फलक लावण्यात आले असून, भविकांना प्रवेशद्वारावरच मास्कची सक्ती करण्यात आली आहे. सॅनिटायझरने हात स्वच्छ करून मगच प्रवेश दिला जात आहे व भाविकांनी एकमेकांत सुरक्षित अंतर ठेवावे याबाबतदेखील सूचना केल्या जात आहेत.

हेही वाचा :

Back to top button