दै. पुढारी विशेष शैक्षणिक : बहुजनांच्या हितासाठी झटणारी मविप्र संस्था | पुढारी

दै. पुढारी विशेष शैक्षणिक : बहुजनांच्या हितासाठी झटणारी मविप्र संस्था

क्षण हे सर्वांगीण उन्नतीचा पाया आहे. अज्ञानाच्या खोल गर्तेतून बाहेर पडत आदिवासी व बहुजन समाज तेजाच्या शिखराकडे मार्गस्थ व्हावा, या हेतूने महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील, बडोद्याचे सयाजीराव गायकवाड, इंदूरचे होळकर, धार संस्थानचे श्रीमंत उदाजी पवार महाराज आदींनी सामाजिक परिवर्तनासाठी शिक्षणाची आवश्यकता विशद करून कृतिशील पावले टाकली. त्यांच्या विचारांतून प्रेरणा घेत जनतेचे कल्याण आणि आनंदासाठी सामाजिक हेतू जागृत करण्याचे कार्य डोळ्यासमोर ठेवून सामाजिक बांधिलकीतून कर्मवीर रावसाहेब थोरात, कर्मवीर काकासाहेब वाघ, कर्मवीर भाऊसाहेब हिरे, कर्मवीर डी. आर. भोसले, कर्मवीर अण्णासाहेब मुरकुटे, कर्मवीर गणपतदादा मोरे आदी समाजधुरिणांनी 1914 मध्ये मराठा विद्या प्रसारक समाज या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली. शेतकरी, आदिवासी, बहुजन समाजाला शिक्षित करणे हा त्यांचा मुख्य उद्देश होता. अनेकांच्या समर्पण, त्याग व योगदानातून ही संस्था यशोशिखरावर गेली. सातार्‍याच्या रयत शिक्षण संस्थेखालोखाल संस्थेचा विस्तार आहे. 10 हजारांपेक्षा अधिक शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, दोन लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी, 800 कोटींचे वार्षिक अंदाजपत्रक, केजीपासून ते वैद्यकीय शिक्षणापर्यंतचा जिल्हाभर विस्तार आहे.

मराठा समाजाकडे बहुजन समाजाचे नेतृत्व करणारा समाज म्हणून पाहिले जात होते आणि या समाजाने नेहमीच बहुजन समाजाला सोबत घेत आजपर्यंत वाटचाल केलेली आहे. त्यामुळे मराठा समाजावरून संस्थेचे नाव असले, तरीसुद्धा अठरापगड जातींना पहिल्या दिवसापासून बरोबर घेण्याचे काम संस्थेच्या संस्थापकांनी केलेले आहे. नाशिक जिल्ह्यातील बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी सर्वप्रथम एक वसतिगृह स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार 1914 साली उदोजी महाराज वसतिगृहाची स्थापना झाली. धारच्या उदोजी महाराज पवार यांनी दरवर्षी तीन हजार रुपये संस्थेला दिले. ते 1948 पर्यंत म्हणजेच संस्थाने खालसा होईपर्यंत सुरू होते. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी तसेच समाजातील अनेक दानशूर व्यक्तींनी वेळोवेळी मोठी भरीव स्वरूपाची आर्थिक मदत संस्थेला केली.

सुरुवातीच्या काळात वसतिगृहासाठी विद्यार्थी गोळा करण्याकरिता गणपतदादा मोरे यांनी गावोगावी जलसे करून प्रयत्न केले. रावसाहेब थोरातांसह सर्व संस्थापक गावोगावी जाऊन प्रबोधन करायचे. शाळा चालविण्यासंबंधीची माहिती व्हावी यासाठी राजर्षी शाहू महाराजांनी दोन सनदी अधिकारीही मदतीला पाठविले होते. नाशिक जिल्ह्यामध्ये अशा 139 शाळा सुरू केलेल्या होत्या. मात्र, शिक्षकांचा पगाराचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. अशा काळात सयाजीराव महाराज, उदोजी महाराज, देवासचे महाराज, कागल, सातारा, कोल्हापूर आणि इंदूरच्या संस्थानांनी आर्थिक मदतीचा हात दिला. त्याशिवाय संस्थापकांनी धान्य गोळा करणे, पैसे गोळा करणे आदी माध्यमातून मुलांना अन्न दिले. पुढे रावसाहेब थोरात यांनी लोकल बोर्डाचे (जिल्हा परिषद) अध्यक्ष असताना सर्व 139 शाळा लोकल बोर्डाकडे वर्ग केल्या. या धुरिणांनंतर संस्थेचा व्याप कै. अ‍ॅड. बाबूराव ठाकरे, अ‍ॅड. विठ्ठलराव हांडे यांनी सांभाळला.

कै. अ‍ॅड. बाबूराव ठाकरे यांच्या काळात माध्यमिक शिक्षणाचे जाळे मोठ्या प्रमाणावर विस्तारले. समाजातील विविध घटकांची सर्व प्रकारची सक्रिय मदत झाली. संस्थेने 2014 मध्ये शतकमहोत्सवी वर्ष साजरे केले. या शतकात संस्थेने देदीप्यमान प्रगती केलेली आहे. या कार्याची दखल घेऊन संस्थेस महाराष्ट्र शासन व यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ यांनी आदर्श शैक्षणिक संस्थेचा पुरस्कार त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाकडून आदिवासी सेवा संस्था पुरस्कार देऊन गौरविलेले आहे. विद्यार्थी केंद्रबिंदू ठेवून विद्यार्थ्याच्या प्रगतीसाठी काम करणारी ही संस्था आहे. ही कुठल्या एका व्यक्तीची संस्था नाही. आज साडेसहा हजार सभासद आहेत.

108 वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात कार्य
‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ या ध्येयाने स्थापित झालेली व गेल्या 108 वर्षांपासून नाशिक जिल्ह्यातील मुख्यत्वे आदिवासी व ग्रामीण भागात शिक्षणाच्या क्षेत्रात कार्य करणारी मविप्र संस्था आपल्या वैद्यकीय, अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, औषधनिर्माण महाविद्यालय, नर्सिंग महाविद्यालय व औद्योगिक प्रशिक्षण केंद्र या विद्याशाखांच्या मार्फत आपले बहुमोल योगदान देत आहे.

– नितीन ठाकरे, सरचिटणीस

Back to top button