कोळपेवाडी; पुढारी वृत्तसेवा : प्रोत्साहनपर अनुदानापासून वंचित असलेल्या 6 हजार शेतकर्यांना अनुदान मिळवून देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. शेतकर्यांचे आधार प्रमाणीकरणासाठी 2095 शेतकर्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे, असे सांगत या शेतकर्यांना लवकरच 50 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान मिळणार असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली.
आ.आशुतोष काळे यांनी म्हटले आहे की, महाविकास आघाडी सरकारने शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी शेतकर्यांची कर्जमाफी करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेवून नियमित कर्ज फेड करणार्या कर्जदार शेतकर्यांसाठी म. ज्योतिराव फुले सन्मान योजना योजना जाहीर करून या नियमित कर्जफेड करणार्या शेतकर्यांना प्रोत्साहनपर अनुदान म्हणून 50 हजार रुपये देण्याचे जाहीर केले होते.
त्या निर्णयाची अंमबजावणी होवून 1 हजार 323 शेतकर्यांना हे अनुदान यापूर्वीच मिळाले होते, मात्र जवळपास 6000 शेतकरी या प्रोत्साहनपर अनुदानापासून वंचित होते. त्यासाठी आ.आशुतोष काळे यांचा शासनदरबारी पाठपुरावा सुरू होता. त्या पाठपुराव्याची शासनाने दखल घेवून 2095 पात्र शेतकर्यांचे आधार प्रमाणीकरण करण्यासाठी शेतकर्याच्या नावाची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
यामध्ये 1697 जिल्हा बँकेचे व 398 इतर शेतकर्यांचे राष्ट्रीयकृत बँकेचे आधार प्रमाणीकरण करण्यात येणार आहे. ही प्रिक्रिया पूर्ण होताच या 2095 लाभधारक शेतकर्यांच्या बँक खात्यात 50 हजार रुपये अनुदान जमा होणार आहे.त्यामुळे प्रोत्साहनपर अनुदानापासून वंचित असणार्या शेतकर्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून या शेतकर्यांनी आ.आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे.