

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सोशल मीडियावरून दोन तरुणींचे विनयभंग झाल्याप्रकरणी गंगापूर व आडगाव पोलिस ठाण्यात संशयितांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणी पोलिस तपास करीत आहेत.
गंगापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या व वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार तिच्या दिल्लीतील प्रियकराने इन्स्टाग्रामवरून विनयभंग केला. दोघांची एप्रिल २०२२ मध्ये इन्स्टाग्रामवर ओळख झाल्यानंतर त्यांच्यात प्रेमसंबंध झाले. संशयिताने पीडितेचे अश्लील फोटो, व्हिडिओ काढले. तसेच व्हिडिओ कॉलवर अश्लील संवाद साधताना ते रेकॉर्डिंग केले. त्यानंतर प्रियकराने पीडितेचे अश्लील व्हिडिओ व छायाचित्र तिच्या पालकांना, मित्रांना व्हॉट्सअप, इन्स्टाग्रामवरून पाठवून पीडितेचा विनयभंग केला.
संशयिताने ३ जुलैला पीडितेच्या घरी जाऊन तिस मारहाण करीत तिच्याकडील सोन्याचे दागिने, पैसे घेतले तसेच तिचा आयफोन फोडून नुकसान केले. वारंवार संशयिताकडून त्रास दिला जात असल्याने पीडितेने गंगापूर पोलिस ठाण्यात संशयिताविरोधात विनयभंग, अपहार, मारहाण, माहिती तंत्रज्ञान अधिनियम कायद्यानुसार फिर्याद दाखल केली आहे.
तर दुसऱ्या घटनेत इन्स्टाग्रामवरून तरुणीचा पाठलाग करून तिला एप्रिल ते जुलै २०२२ दरम्यान, अश्लील मेसेज पाठवून एकाने विनयभंग केला. या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीनुसार, आडगाव पोलिस ठाण्यात संबंधित इन्स्टाग्राम युजर विरोधात ॲट्रॉसिटीसह विनयभंग, माहिती तंत्रज्ञान अधिनियम कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सहायक पोलिस आयुक्त गंगाधर सोनवणे तपास करीत आहेत. पोलिसांनी संशयितास अटक केली आहे.