

लोणी-धामणी; पुढारी वृत्तसेवा : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील मांदळेवाडी, वडगाव पीर, लोणी व शिरूर तालुक्यांच्या पश्चिम भागातील घोलपवाडी, ढगेवाडी, थापेवाडी परिसरात रब्बी हंगामातील ज्वारीचे पीक जोमात व फुलोर्यात आले आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. रब्बी हंगामातील ज्वारीची पेरणी ज्या शेतकर्यांनी लवकर केली अशांचे ज्वारीचे पीक जोमात आले आहे. खरीप हंगामात पावसाने जोरदार हजेरी लावून शेतकर्यांची मोठी धावपळ झाली होती.
त्याच पावसाच्या ओलीवर या परिसरात ज्वारीची पेरणी करण्यात आली. सध्या ज्वारी पीक जोमात फुलोर्यात आल्याने पाखरांपासून संरक्षण करण्यासाठी शेतकरी ज्वारीचे राखण करताना दिसतात. ज्वारी पिकाचा दुहेरी फायदा होत असल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात ज्वारीचे पीक घेतात. ज्वारीपासून धान्य व मोठ्या प्रमाणात कडबा मिळत असल्याने जनावरांच्या खाद्याचा देखील प्रश्न मिटतो. काही शेतकरी ज्वारीचे पीक चांगले निघाले, तर कडबा विकतात व त्यापासून दोन पैसे मिळतात, असे सुरेश घोलप व आप्पा मांदळे यांनी सांगितले.