नाशिक : ‘बोरी’विरोधात आज नागपूरला मोर्चा | पुढारी

नाशिक : ‘बोरी’विरोधात आज नागपूरला मोर्चा

नाशिक (मालेगाव मध्य) : पुढारी वृत्तसेवा
बोरी – अंबेदरी धरणातून होणार्‍या बंदिस्त कालवा प्रकल्पाविरोधात गेल्या 48 दिवसांपासून धरणे आंदोलन करूनही दखल घेतली जात नसल्याने संतप्त शेतकर्‍यांनी शनिवारी (दि. 24) पाटबंधारे विभाग कार्यालयावर मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांनी दहिदी गावाजळ रोखले. त्यामुळे महिलांनी पुन्हा एकदा जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर आंदोलकांनी माघार घेतली.

कालवा बंदिस्त करण्यास दहिदी, राजमाने, वनपट, टिंगरी या गावातील प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांचा तीव्र विरोध आहे, तर दुसरीकडे झोडगे व माळमाथ्यावरील शेतकरी प्रकल्प मार्गी लावावा, यासाठी आक्रमक झाले आहेत. परस्परविरोधी भूमिकेमुळे दोन गट पडून आंदोलनसत्र सुरू असून, त्यातून एका शेतकर्‍याने प्रकल्पाच्या विरोधात आत्महत्येचाही प्रयत्न केला. दरम्यान, प्रकल्पाचा प्रत्यक्षात काम सुरू झाल्याने आंदोलन चिघळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. त्यातून आंदोलक शेतकर्‍यांची पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता संदीप पवार यांनी विभागाचे वरिष्ठ अधिकारी शनिवारी भेट घेेतील, असे आश्वासन आंदोलकांना दिले होते. मात्र त्यानुसार कुणीच न फिरकल्याने संतप्त आंदोलकांनी थेट शहरातील पाटबंधारे विभागाच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढला. पोलिसांनी त्यांना दाहिदी गावाजवळ रोखले. यावेळी पोलिस व आंदोलकामध्ये शाब्दिक चकमक झाली. दुसरीकडे काही महिलांनी पुन्हा धरणाकडे धाव घेतल्याने गोंधळ उडाला. अखेर पोलिसांनी संबंधितांना प्रतिबंध केला. आंदोलकांनी प्रकल्पाच्या विरोधात पत्रक वाटप करून निषेध नोंदवला.

प्रशासन याप्रश्नी तोडगा काढण्यात अपयशी ठरले आहे. दिवसेंदिवस आंदोलक आक्रमक होत आहेत. सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे. आता आंदोलकांनी थेट नागपूरला धडक मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. आंदोलक सोमवारी नागपुरात दाखल होऊन शासनाचे लक्ष वेधणार आहेत. – भूषण कचवे, याचिकाकर्ते.

हेही वाचा:

Back to top button