घोडेगाव : पुढारी वृत्तसेवा : नेवासा तालुक्यातील लोहोगाव परिसरात बिबट्याचा वावर वाढला असून, परिसरात घबराटीचे वातावरण आहे. शनिवारी (दि.24) पहाटे भारत रामभाऊ गायकवाड यांच्या वस्तीवर बिबट्याने कालवडीवर हल्ला करून लचके तोडले. गायकवाड शेतातील विद्युत मोटर सुरू करण्यासाठी पहाटे उठले असता जखमी कालवड व बिबट्या दिसला. त्यांनी काठी व बॅटरीच्या सहाय्याने बिबट्याला हुसकावून लावले. बिबट्याच्या हल्ल्यात जखमी कालवड शनिवारी रात्री मरण पावली. दोन दिवसांपूर्वी गावातीलच तनपुरे यांचा व गायकवाड यांच्या पाळीव कुत्रे बिबट्याने मारले, लोहोगाव परिसरातील शेतकरी भयभीत झाले असून, शेतात पाणी देण्यासाठी जायला शेतकरी धजावत नाहीयेत. लोहोगाव परिसरात कायमस्वरूपी पिंजरा बसवावा, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. यापूर्वीही परिसरात बिबट्याने हल्ला करून अनेक जनावरे व कुत्रे मारली आहेत. अनेकदा मागणी करूनही वनविभाग लक्ष देत देत नसल्याने शेतकर्यांच्या भावना संतप्त आहेत. लोहोगाव येथे पिंजरा लावून या बिबट्यास तत्काळ जेरबंद करावे, शेतकर्यास वनविभागाने भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थ करत आहेत.