जळगाव जिल्हा बँकेच्या संचालिका जनाबाई महाजन अपात्र ; खडसे गटाला धक्का | पुढारी

जळगाव जिल्हा बँकेच्या संचालिका जनाबाई महाजन अपात्र ; खडसे गटाला धक्का

जळगाव : रावेर तालुक्यात राजकीय भुकंप झाला असुन, जळगाव जिल्हा बँकेच्या संचालिका जनाबाई गोंडू महाजन अपात्र ठरल्या आहेत. त्यांना पुढील तीन वर्ष कोणत्याही सहकारी संस्थेत निवडणूका लढवण्यास बंदी केल्याचे आदेश नासिक येथील विभागीय सहनिबंधक विलास गावडे यांनी दिले आहेत. यामुळे जिल्हातील सहकार क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. या बाबतची माहिती माजी आमदार अरुण पाटील यांचे पूतणे मंदार पाटील यांनी रावेरात पत्रकार परिषद घेऊन दिली आहे.

गेल्या वर्षाच्या अखेरीस अर्थात २१ नोव्हेंबर २०२१ रोजी झालेल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत रावेर सोसायटी मतदारसंघातून धक्कादायक निकाल लागला होता. माजी आमदार अरूण पाटील यांनी आपली उमेदवारी कायम ठेवल्याने आ. एकनाथ खडसे यांच्या पॅनलतर्फे ऐनवेळेस कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती गोंडू महाजन यांच्या पत्नी जनाबाई गोंडू महाजन यांना उमेदवारी देण्यात आली होती. प्रतिस्पर्धी जनाबाई महाजन व राजीव पाटील या दोघा उमेदवारांनी माजी आमदार अरुण पाटील यांना जाहीर पाठींबा दिला होता.

निवडणूक खर्च न दिल्याने कारवाई…

जनाबाई महाजन यांनी राजकीय खेळी करत ही लढत चुरशीची केली. यात अरूण पाटील यांचा अवघ्या एक मताने पराभव करून जनाबाई महाजन या विजयी झाल्या होत्या. दरम्यान, नियमानुसार निकाल लागल्यापासून ६० दिवसांच्या आत निवडणुकीचा खर्च दाखविणे आवश्यक होते. तथापी, अंतीम मुदत उलटून गेल्यानंतर देखील त्यांनी खर्चाचे विवरण दाखल केले नव्हते. या संदर्भात माजी आमदार अरुण पाटील यांचे पुतणे मंदार पाटील यांनी माहितीच्या अधिकारात मिळालेली माहिती घेऊन यांनी सहकार खात्याकडे दाद मागितली होती.

तीन वर्ष निवडणूक लढविण्यावर बंदी…

या अनुषंगाने जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था विलास गावडे यांनी जनाबाई गोंडू महाजन यांना अपात्र ठरविले आहे. तसेच पुढील तीन वर्ष कोणत्याही सहकार संस्थेत निवडणूक लढविण्यावर बंदी घातली आहे. या बाबतची माहिती आज मंदार पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केली. यावेळी पत्रकार परीषदेला राष्ट्रवादी कॉग्रेस तालुका अध्यक्ष निळकंठ चौधरी, कॉग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष डॉ राजेंद्र पाटील, सूर्यभान चौधरी, कॉग्रेस शहराध्यक्ष संतोष पाटील, नितीन पाटील उपस्थित होते.

हेही वाचा :

Back to top button