पिंपरी : मुळा नदी सुधार प्रकल्पासाठी साडेचार कोटींचा सल्लागार | पुढारी

पिंपरी : मुळा नदी सुधार प्रकल्पासाठी साडेचार कोटींचा सल्लागार

पिंपरी : पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या मुळा नदी पुनरूज्जीवन प्रकल्पास पिंपरी-चिंचवड शहर हद्दीतील एका काठाच्या कामासाठी 321 कोटींची स्वतंत्र निविदा काढण्यात आली आहे. आता याच कामासाठी सल्लागारांवर 4 कोटी 29 लाख 94 हजार 554 रपये खर्च केले जाणार आहेत. त्यामुळे या प्रकल्पाचा खर्च हळूहळू वाढत आहे. शहरातून पवना, इंद्रायणी व मुळा या तीन नद्या वाहतात. त्यातील पवना व इंद्रायणी नदी सुधार योजना पालिका स्वत: राबवित आहे. मुळा नदीचा प्रकल्प पुणे पालिका राबवित असून, त्यासाठी पिंपरी-चिंचवड पालिका केवळ निधी उपलब्ध करून देणार होती. पालिका हद्दीत वाकड बायपास ते बोपखेल असे 14.40 किलोमीटर असे मुळा नदीचे एका बाजूचा काठ आहे.

त्यात पिंपळे निलख,दापोडी, बोपखेल येथे संरक्षण विभागाचा भाग आहे. या कामांचा आराखडा बनविण्यासाठी सल्लागार एजन्सी पुणे पालिकेने नेमली आहे. त्याचे शुल्क पिंपरी-चिंचवड पालिकेने अदा केले आहे. या प्रकल्पासाठी पिंपरी-चिंचवड पालिकेस 750 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. हा प्रकल्प पुणे पालिका राबविणार होती. त्यासाठीचा खर्च पिंपरी-चिंचवड पालिका पुण्यास देणार होती. त्याला तत्कालीन आयुक्तांनी 31 ऑगस्ट 2015 ला मान्यता दिली होती. तसेच, तसा ठराव मागील पंचवार्षिकेत सर्वसाधारण सभेत मंजुरही झाला होता.

मात्र, प्रशासकीय राजवटीत पुणे व पिंपरी-चिंचवड पालिकेचा हा संयुक्त प्रकल्प मोडित काढत स्वतंत्र निविदा काढण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यातील वाकड ते सांगवी पुल या 8.80 किलोमीटर अंतराच्या नदीच्या एका बाजूच्या कामासाठी 320 कोटी 85 लाख 48 हजार 785 खर्चाची आंतरराष्ट्रीय निविदा 17 नोव्हेंबरला प्रसिद्ध झाली. निविदा 5 जानेवारी 2023 पर्यंत स्वीकारली जाणार आहे. या कामावर देखरेख व दर्जा राखण्यासाठी सल्लागार नेमला जाणार आहे. त्यासाठी साडेचार कोटी खर्चाची स्वतंत्र निविदा प्रसिद्ध केली आहे. सल्लागाराला एकूण कामांच्या 1.34 टक्के शुल्क अदा केले जाणार आहे. पावसाळा सोडून 3 वर्षे या कामांची मुदत आहे. 5 जानेवारीपर्यंत निविदा स्वीकारली जाणार आहे. त्यामुळे नदी सुधारचा खर्च वाढत चालला आहे.

मुळा नदी प्रदूषणमुक्त होण्यासाठी विविध कामे केली जाणार आहेत. त्यात मैलासांडपाणी तसेच, रासायनिक सांडपाणी नदीत थेट मिसळणार नाही यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभी केली जाणार आहे. ड्रेनेज वाहिन्याद्वारे सांडपाणी एसटीपीपर्यंत पोहचवून त्यावर प्रक्रिया करून ते पाणी नदीत सोडले जाणार आहे. नदीकाठावरील सर्व घाट, उद्यान, स्मशानभूमी, धोबी घाट आदींची दुरूस्ती करून सुशोभित केले जाणार आहे. नदीकाठी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करून वॉकिंग ट्रॅक बांधण्यात येणार आहे. या कामाचा दर्जा राहावा म्हणून त्यावर सल्लागार देखरेख ठेवणार आहे.

Back to top button