नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यात तसेच नाशिक शहर व अहमदनगर जिल्ह्यात विविध गुन्ह्यांमध्ये सहभाग असणार्या अट्टल चोरट्यांपैकी एका चोरट्याला जेरबंद करण्यात वावी पोलिसांना यश आले असून अंधाराचा फायदा घेऊन दोन चोरटे फरार झाले. सुरज मनोहर कापसे (रा. घुलेवाडी, ता. संगमनेर) असे चोरट्याचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून दोन मोटारसायकली जप्त केल्या आहेत.
वावी पोलिस ठाण्याच्या अंतर्गत येणार्या नांदूरशिंगोटे परिसरात गेल्या काही दिवसांपासून घरफोड्या, चोर्यांचे सत्र वाढल्याने सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर कोते यांच्यासह पोलिसांनी नांदूरशिंगोटे भागात रात्रीची गस्त वाढवली आहे. सोमवारी (दि.19) सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर कोते यांच्यासह पोलिस कर्मचारी भास्कर जाधव, रत्नाकर तांबे हे पोलिस वाहनातून नांदूरशिंगोटे परिसरात गस्त घालत असताना नांदूरशिंगोटे गावात बायपासजवळ तीन इसम संशयितरित्या फिरताना दिसले. पोलिसांनी त्यांच्याजवळ जात त्यांची चौकशी सुरु केली असता ते पळून जाऊ लागले.
त्यावेळी सुरज मनोहर कापसे यास पोलिसांनी पकडले तर दोघे अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. पोलिसांनी सुरज कापसेला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने पळून गेलेल्या साथीदारांची नावे सांगितली. तुषार बारकु गोरडे व निखिल शिवाजी वाल्हेकर यांच्या सोबतीने घरफोडी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी घटनास्थळावरुन होंडा कंपनीची शाईन व बजाज पल्सर-220 अशा दोन मोटारसायकली जप्त केल्या. सदर दुचाकींची चौकशी केली असता सदर दोन्ही दुचाकी वाळुंज पोलिस ठाणे व सिन्नर एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून चोरी केल्याची माहिती मिळाली. फरार झालेला संशयित तुषार बारकु गोरडे (रा. पारेगाव, ता. संगमनेर) याच्यावर इंदिरानगर, मुंबई नाका, उपनगर, चंदननगर, संगमनेर, लोणीकंद या पोलिस ठाण्यात 8 गुन्ह्यांची नोंद असल्याची प्राथमिक माहिती मिळाली.
पोलिस अधिक्षक शहाजी उमाप, अप्पर पोलिस अधिक्षक माधुरी कांगणे, उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली वावीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर कोेते यांच्या नेतृत्वाखाली पोलिस तिसरा संशयित निखिल शिवाजी वाल्हेकर, रा. घुलेवाडी, ता. संगमनेर याचा शोध घेत आहेत. याप्रकरणी पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक तांदळकर करत आहेत