नाशिक : गोदापात्रातून सहा टन पाणवेली संकलित, महापालिकेतर्फे स्वच्छता मोहीम | पुढारी

नाशिक : गोदापात्रातून सहा टन पाणवेली संकलित, महापालिकेतर्फे स्वच्छता मोहीम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महापालिकेतर्फे गोदावरी नदीपात्राची स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली असून, गेल्या पाच दिवसांत नदीपात्रातून सुमारे पाच टन इतक्या पाणवेली काढण्यात आल्या आहेत.

आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या सूचनेनुसार आणि गोदावरी संवर्धन कक्षप्रमुख तथा उपआयुक्त डॉ. विजयकुमार मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली ट्रश स्किमर मशीनद्वारे स्वच्छता मोहीम सुरू आहे. शहरातील होळकर पूल, घारपुरे घाट तसेच चोपडा लॉन्स परिसरात क्रॅश स्किमर मशीनद्वारे पाणवेली काढण्यात आली. दि. १९ ते २३ डिसेंबरपर्यंत सुमारे सहा टन पाणवेली काढण्यात आल्या. तसेच यापुढेही आनंदवलीपर्यंत नदी पात्रातील पाणवेली काढण्याचे काम सुरू राहणार आहे. स्मार्ट सिटीकडून होत असलेल्या या कामावर आता महापालिकेच्या गोदावरी संवर्धन कक्षाचे नियंत्रण राहणार आहे. गोदावरी नदी आणि तिचे पात्र नितळ, स्वच्छ राहण्यासाठी महापालिकेकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. मनपाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागासह सामाजिक संस्था, एनसीसी कॅडेट्स यांच्या सहकार्याने स्वच्छता मोहीम राबविली जात आहे.

संत गाडगे महाराज पुण्यतिथीनिमित्त २० डिसेंबरला गोदावरी, वाघाडी नदीपात्रालगत स्वच्छता करण्यात आली. त्यावेळी तीन टन कचरा संकलित करण्यात आला होता. तसेच प्लास्टिक बंदीबाबतही जनजागृती करण्यात आली होती. यापुढेही सातत्याने स्वच्छता मोहीम राबवून, जनजागृती करून गोदापात्र स्वच्छ ठेवण्याची दक्षता घेतली जाणार असल्याचे उपआयुक्त डॉ. मुंढे यांनी सांगितले.

हेही वाचा :

Back to top button