‘ग्लोबल बाँड इंडेक्स’ आणि भारत | पुढारी

‘ग्लोबल बाँड इंडेक्स’ आणि भारत

“`जागतिक कर्जरोखे बाजार निर्देशांकात भारताचा समावेश झाल्यास एकूण गुंतवणुकीचा ओघ भारताकडे वाढेल. नवोदित राष्ट्रांत गुंतवणूक संधी, सुरक्षितता, परतावा या निकषांवर भारताचे पत मानांकन उंचावल्याने विकासाकरिता, विशेषत: पायाभूत सेवा (रस्ते, वीज, दळणवळण इ.) या क्षेत्रांत आवश्यक भांडवल उपलब्ध होऊन विकासाचा दर वाढेल हा महत्त्वाचा फायदा यातून मिळेल. आपला विदेश व्यापारतोल लक्षणीय प्रमाणात सुधारणा दर्शवेल आणि परकीय गंगाजळी वाढेल. यातून दरवर्षी भारतीय रुपया 2 टक्क्यांनी बळकट होईल.

जागतिक स्तरावर भारतीय बाजारपेठ गुंतवणुकीचे आकर्षक व सुरक्षित, पारदर्शी व नियमबद्ध म्हणून ओळखली जाते. त्याचा परिणाम म्हणून सातत्याने परकीय गुंतवणूक विविध क्षेत्रांत वाढत असताना दिसते. विदेशी गुंतवणूकदार संस्थांची गुंतवणूक ही प्रामुख्याने धोरणे, भविष्यकालीन परतावा, सुरक्षितता या निकषांवर होत असताना राजकीय स्थैर्य, धोरण सुसंगतता या बाबीदेखील ठळकपणे लक्षात घेतल्या जातात. विदेशी गुंतवणूक प्रत्यक्ष प्रकल्पात (FDI) तसेच शेअर बाजारात (Portfolio Investment) लक्षणीय प्रमाणात असली, तरी भारताचा ऋणपत्रे किंवा कर्जरोखे बाजार मात्र बाल्यावस्थेत राहिला. विदेशी गुंतवणूकदार सरकारी कर्जरोखे तसेच मोठ्या उद्योगांचे जागतिक कर्जरोखे यामध्ये अल्पप्रमाणातच गुंतवणूक करतात हे चित्र आता बदलणार आहे. कारण, भारतीय कर्जरोखे जागतिक कर्जरोखे निर्देशांकात (Global Bond Index) समाविष्ट होणार असून त्याचे सकारात्मक परिणाम संपूर्ण अर्थव्यवस्थेवर दिसणार आहेत. या परिणामांचा अभ्यास केवळ गुंतवणूक क्षेत्रातील संबंधितांनाच नव्हे, तर एकूण सर्व आर्थिक क्षेत्रावर होणार आहे, हे समजून घेणे महत्त्वाचे ठरते.

जागतिक कर्जरोखे बाजार

संबंधित बातम्या

विविध देशांचे सार्वभौम शासन तसेच बहुराष्ट्रीय कंपन्या आपले कर्जरोखे त्या देशाच्या बाजारात विकतात ते स्थानिक अथवा अंतर्गत कर्जरोखे असतात. जेव्हा इतर देशाच्या चलनात व इतर देशांत विकले जातात तेव्हा ते जागतिक कर्जरोखे होतात. युरोबाँड हे युरोपातील देशांत डॉलर किंवा अन्य चलनात असतात. फ्रान्सची कंपनी जपानच्या येन चलनात कर्जरोखे विकते हे जागतिक कर्जरोखे ठरतात. असे कर्जरोखे स्थिर किंवा तरत्या अथवा बदलत्या व्याजदराचे असतात. त्याची मुदत 1 वर्ष ते 30 वर्षे अशी अल्पकालीन ते दीर्घकालीन असू शकते. आपले कर्जरोखे जागतिक बाजारात विकले जाणे यातून जागतिक कर्जपात्रता जशी सिद्ध होते तसेच चलनस्थिरता, देशांतर्गत धोरण सुसंगतता व स्थिरता सिद्ध होते. कारण, या बाबी नसतील तर कर्जरोखे विकले जाऊ शकत नाहीत. विकसित देशांतील कर्जरोख्यांप्रमाणे नवोदित राष्ट्रांचे (Energing ecencmies) कर्जरोखे जागतिक कर्जरोखे बाजाराचे घटक आहेत.

जागतिक कर्जरोखे बाजार निर्देशांकात भारताचा समावेश झाल्यास एकूण गुंतवणुकीचा ओघ भारताकडे वाढेल. नवोदित राष्ट्रांत गुंतवणूक संधी, सुरक्षितता, परतावा या निकषांवर भारताचे पत मानांकन उंचावल्याने विकासाकरिता, विशेषत: पायाभूत सेवा (रस्ते, वीज, दळणवळण इ.) या क्षेत्रांत आवश्यक भांडवल उपलब्ध होऊन विकासाचा दर वाढेल हा महत्त्वाचा फायदा यातून मिळेल. आपला विदेश व्यापारतोल लक्षणीय प्रमाणात सुधारणा दर्शवेल आणि परकीय गंगाजळी वाढेल.

यातून दरवर्षी भारतीय रुपया 2 टक्क्यांनी बळकट होईल. भारताला दीर्घकालीन गुंतवणुकीस आवश्यक भांडवल कमी खर्चात उपलब्ध झाल्याने दीर्घकालीन भांडवल व्याजदर आणि अल्पकालीन व्याजदर यातील फरक कमी होईल. जागतिक कर्जरोखे बाजारात वाढते पतमानांकन हे भारताच्या मोठ्या कंपन्यांनादेखील स्वस्त भांडवल उपलब्ध करू शकेल. सध्या सरकारच्या अत्यल्प व खर्चात असणारी तूट म्हणजे राजकोषीय तूट. ही तूट राष्ट्रीय उत्पन्नाच्या तुलनेत 15 टक्के इतकी आहे. हे प्रमाण बाँड गुंतवणूक वाढल्याने 2029 पर्यंत 5 टक्क्यांनी कमी होईल, असा अंदाज आहे.

बँकिंग क्षेत्राला या नव्या क्षेत्रात विस्ताराला संधी मिळाल्यामुळे एकूण वित्त बाजारपेठ विस्तारेल. बिगर-बँकिंग वित्त संस्थांचाही व्यवसाय विस्तारेल. एकूणच भारतीय ऋणपत्रे किंवा बाँडस् जागतिक निर्देशांकात समाविष्ट झाल्यामुळे विकासाचा वाढता दर, राजकोषीय तूट कमी होणे, रुपया बळकट होणे, व्याजदरात अल्प व दीर्घकालीन तफावत घटणे, वित्तबाजार सखोल व विस्तीर्ण होणे, परकीय गंगाजळीत सुधारणा यासारखे अनेकविध लाभ मिळतील. ही सुवर्णसंधी चीनमधील गुंतवणूक ओघ घटत असल्याच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची ठरते.

सध्या तर चीनमध्ये कोरोनाने उच्छाद मांडला आहे. त्यामुळे तेथील अर्थव्यवस्थेला जोरदार हादरे बसत चालले आहेत. भारतासाठी ही मोठी संधी म्हटली पाहिजे. त्याचा पुरेपूर लाभ भारताने उठवला पाहिजे. दुसरे म्हणजे, ग्लोबल बाँड इंडेक्समध्ये समावेश झाल्यामुळे भांडवल बाजारात चढ-उतार वाढतील आणि रुपया अधिक अस्थिर होईल, अशी शंका व्यक्त होत आहे. त्याचे उत्तर म्हणजे भारतीय अर्थव्यवस्था असे बदल सहज पचवू शकते आणि जागतिक अर्थव्यवस्थेत एक वेगवान, सुरक्षित व चांगला परतावा देणारी बाजारपेठ असे चित्र निर्माण करू शकते. आगामी दशक भारताचे असेल, असे सांगितले जात आहे. त्यामुळेच वेगवान विकासाच्या आगामी दशकासाठी ग्लोबल बाँड इंडेक्समधील भारताचा प्रस्तावित समावेश हा महत्त्वाचा घटक ठरतो.

ग्लोबल बाँड इंडेक्सचे फायदे

भारतीय कर्जरोखे किंवा बाँडस हे जागतिक कर्जरोखे निर्देशांकात समाविष्ट होणे हे एखाद्या कंपनीचा शेअर निफ्टी किंवा सेन्सेक्समध्ये समाविष्ट होण्यासारखे आहे. चीनचा समावेश 2019 मध्ये झाला व आता 15 टक्क्यांपर्यंत एकूण बाँड गुंतवणुकीत चीनचा वाटा आहे. भारताचा बाँड बाजारात वाटा फक्त 2 टक्के आहे. जे. पी. मॉर्गन स्टॅन्ले ग्लोबल बाँड इंडेक्सने (गझचॠइख) भारताचा वाटा 9.1 टक्के असेल (भारांक) असे म्हटले असून त्यामुळे कर्जरोखे गुंतवणूक 4 ते 5 पटींनी वाढू शकते. जागतिक पेन्शन फंड तसेच दीर्घ मुदतीचा गुंतवणूक ओघ भारताकडे वाढू शकेल. गोल्डमन सॅकच्या अंदाजानुसार येत्या 10 वर्षांत 170 बिलियन डॉलर्स व 2023 मध्ये 30 बिलियन डॉलर्स गुंतवणूक होईल, असा अंदाज व्यक्त केला आहे. सध्या सार्वभौम बाँड किंवा सरकारी कर्जरोखे बाजार 1.3 ट्रिलियन डॉलर्सचा असून भारतात फक्त 1.7 बिलियनची गुंतवणूक आहे. हे चित्र येत्या 3 ते 5 वर्षांत वेगाने बदलू शकेल. त्याचा मोठा फायदा आपल्या अर्थव्यवस्थेला होईल, हे निःसंशय!

प्रा. डॉ. विजय ककडे

Back to top button