Jalgaon : भुसावळ विभागात फुकट्या प्रवाशांवर कारवाई, एकाच दिवसात २३ लाखांचा दंड वसुल | पुढारी

Jalgaon : भुसावळ विभागात फुकट्या प्रवाशांवर कारवाई, एकाच दिवसात २३ लाखांचा दंड वसुल

जळगाव : रेल्वेत विना तिकीट प्रवास करणार्‍या प्रवाशांची कमी नाहीत त्यातच जनरल बोगीत तिकीट तपासणी होत नसल्याने या डब्यातून प्रवास करणार्‍या प्रवाशांचीदेखील संख्या मोठी असल्याने अशा प्रवाशांवर कारवाईसाठी भुसावळ रेल्वे प्रशासनाने भुसावळ विभागात एक दिवसीय धडक तपासणी मोहिम राबवली. या माध्यमातून तब्बल 23.27 लाखांचे उत्पन्न मिळवण्यात आले तर फुकट्या प्रवाशांच्या गोटात कारवाईने प्रचंड खळबळ उडाली.

भुसावळ डीआरएम एस.एस.केडीया, मुख्य विभागीय वाणिज्य व्यवस्थापक शिवराज मानसपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ विभागात वाणिज्य विभाग व आर.पी.एफ.विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने खंडवा ते इगतपुरी, अमरावती-भुसावळ, चाळीसगाव-धुळे, जलंब-खामगाव विभागात एक दिवसीय तिकीट चेकिंग मोहिम राबवण्यात आली.

२८० कर्मचार्‍यांचा मोहिमेत सहभाग
वाणिज्य निरीक्षक, तिकीट तपासनीस आणि आरपीएफचे संयुक्त पथक तयार करून सुमारे ८६ गाड्यांची तपासणी करण्यात आली. नाशिक, मनमाड, भुसावळ, खांडवा, अकोला, बडनेरा या स्थानकांवरही तपासणी करण्यात आली. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी तीन अधिकारी, १८० तिकीट चेकिंग स्टाफ, ४५ वाणिज्य स्टाफ व ५५ आर.पी.एफ.स्टाफ असे एकूण २८० कर्मचारी सहभागी झाले.

अशी झाली दंडात्मक कारवाई
ओपन डिटेल स्टाफ यांनी तीन हजार ४१९ केसेसच्या माध्यमातून १९ लाख ९७ हजार ५६५ रुपयांचा तर स्टेशन स्टाफने २०३ केसेसच्या माध्यमातून एक लाख पाच हजार २७० रुपयांचा तसेच अ‍ॅमेनिटी स्टाफने २९३ केसेसच्या माध्यमातून दोन लाख २४ हजार २५१ रुपयांचा दंड केला. एकूण तीन हजार ९१५ केसेसद्वारे २३ लाख २७ हजार ८६ रुपयांचा दंड वसुल करण्यात आला.

Back to top button