Nashik : मनमाडला रंगला पारंपरिक गुरू-दा-गद्दी सोहळा, देशभरातून भाविकांची हजेरी | पुढारी

Nashik : मनमाडला रंगला पारंपरिक गुरू-दा-गद्दी सोहळा, देशभरातून भाविकांची हजेरी

नाशिक (मनमाड) : पुढारी वृत्तसेवा

शीख धर्मीयांचे धर्मगुरू गुरू गोविंदसिंग यांच्या 356 व्या पावन प्रकाश पूरबनिमित्त शहरातील गुरुद्वारात गुरू-दा-गद्दी सोहळा आणि सालाना जोडमेला पारंपरिक पद्धतीने उत्साहाच्या वातावरणात रविवारी (दि. 18) साजरा करण्यात आला. सालाना जोडमेलानिमित्त गुरुद्वाराला आकर्षक विद्युत रोषणाई आणि सजावट करण्यात आली होती.

अमृतसर आणि नांदेडनंतर मनमाडचा गुरुद्वारा महत्त्वाचा मानला जातो. दरवर्षी गुरू गोविंदसिंग यांच्या पावन प्रकाशनिमित्त गुरू-दा-गद्दी सोहळा आणि सालाना जोडमेला साजरा करण्याची येथे परंपरा आहे. मात्र, कोरोनामुळे हा सोहळा साजरा करण्यात आला नव्हता. आता कोरोना आटोक्यात आल्यामुळे हा सोहळा जल्लोषात साजरा करण्यात आला. यानिमित्त गुरुद्वारात सुरू असलेल्या अखंड पाठची आज समाप्ती करण्यात आली. शिवाय भजन, कीर्तन आणि लंगर आदींसह धार्मिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते. दुपारी नांदेड गुरुद्वारा प्रबंधक बाबा नरेंद्रसिंग कारसेवावाले, मनमाड गुरुद्वारा प्रबंधक बाबा रणजितसिंग कारसेवावाले यांच्या नेतृत्वाखाली बोले सो निहाल सत श्रीअकाल चा घोष करत पंज प्यारे आणि गुरुग्रंथसाहेब यांची भव्य शोभायात्रा काढण्यात आली. त्यात शीख बांधवांनी तलवारबाजीसह चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करत सर्वांना मंत्रमुग्ध केले.

या सोहळ्यासाठी पंजाब, हरियाणा, दिल्ली यासह देशभरातून मोठ्या संख्येने भाविक आले होते. सर्व जाती-धर्मांच्या लोकांनी ठिकठिकाणी शोभायात्रेचे स्वागत करून बाबा नरेंद्रसिंग, बाबा रणजितसिंग यांचा सत्कार केला. एकात्मता चौकात शोभायात्रा आल्यावर शिवसेना प्रणीत वंदे मातरम् मित्र मंडळातर्फे धर्मगुरूंचा सत्कार करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. संयोजन मंडळाचे प्रमुख संजय कटारिया व इतर कार्यकर्त्यांनी केले.

हेही वाचा :

Back to top button