आधी मतदान; मग लग्न ! बोहल्यावर चढण्याआधी नवरदेवाने केले मतदान | पुढारी

आधी मतदान; मग लग्न ! बोहल्यावर चढण्याआधी नवरदेवाने केले मतदान

बोटा : पुढारी वृत्तसेवा : संगमनेर तालुक्यातील पठार भागातील साकूर गावातील ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया पार पडत असताना लग्नाच्या दिवशीच मतदान असल्याने बोहल्यावर चढण्याआधी नवरदेवाने मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले.  पठार भागातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून साकूर गावाकडे पाहिले जाते. तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्वाची ग्रामपंचायत म्हणून सर्वांचेच लक्ष लागून असलेल्या साकूर ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत थेट सरपंच पदासह, सदस्य पद असे एकूण 18 जागेसाठी मतदान प्रक्रिया पार पडली आहे.  रविवारी सकाळ पासूनच मतदारांनी लोकशाहीचे हात बळकट करण्यासाठी आपला संविधानिक मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मोठ्या संख्येने विरभद्र कॉलेज कॉलेज मतदान केंद्रावर गर्दी केली होती.

विरभद्र कॉलेज कॉलेज साकूर मतदान केंद्रावर नागरिक आपल्या मतदानाचा हक्क बजावत असताना दुसरीकडे याच गावातील भरत अण्णा पेंडभाजे यांचे चिरंजीव केतन पेंडभाजे आणि दत्तात्रय गणपत दुर्गुडे याची कन्या धनश्री दुर्गुडे यांचा विवाह सोहळा पार पडणार होता.  मतदानाचा अधिकार बजावूनच लग्न बंधनात अडकणार असल्याचा असा हट्ट नवरदेवाने केला आणि थेट नवरदेवाचा पोशाख घालूनच मतदान केंद्रात जाऊन आपला मतदानाचा आपला हक्क बजावला. यावेळी मतदान केंद्रावर नवरदेव मतदान करण्यासाठी आल्याचे पाहून बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी शंकर खेमनर, इंद्रजीत खेमनर, निसार पटेल, मनीषाताई शेलार यांसह आदी मतदार उपस्थित होते.

Back to top button