नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महावितरणचे रोहित्र हलविण्यासाठी अंदाजपत्रक तपासणीकरिता लाच मागणाऱ्या उपकार्यकारी अभियंत्यासह दोन कर्मचाऱ्यांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी (दि. १६) कारवाई केली. महावितरणच्या नाशिक परिमंडळाच्या कार्यालयात झालेल्या या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे.
महावितरणचे दोन रोहित्र एका जागेवरून दुसऱ्या ठिकाणी हलविण्यासाठी तक्रारदाराने नाशिक परिमंडळ कार्यालयात अर्ज केला होता. या कामाच्या अंदाजपत्रक तपासणीसाठी उपकार्यकारी अभियंता दीप्ती वंजारी यांनी तक्रारदाराकडे दोन हजार रुपयांची मागणी केली. तसेच सहायक अभियंता राजेंद्र पाटील आणि लिपिक सचिन बोरसे यांनी अनुक्रमे अडीच व २ हजार रुपयांची मागणी तक्रारदाराकडे केली होती. तक्रादाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाच्या पथकाने परिमंडळ कार्यालयात सापळा रचत संशयित आरोपींना लाच घेताना रंगेहाथ पकडले.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस अधीक्षक शर्मिला वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली विभागाचे पोलिस हवालदार पंकज पळशीकर व संतोष गांगुर्डे तसेच पोलिस नाईक नितीन कराड आणि प्रभाकर गवळी आदींच्या पथकाने ही कारवाई केली.