नाशिक : विहिरीत पडलेला बछडा वीस मिनिटांत आईच्या कुशीत | पुढारी

नाशिक : विहिरीत पडलेला बछडा वीस मिनिटांत आईच्या कुशीत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शहरालगतचा ग्रामीण भाग बिबट्या प्रवणक्षेत्र बनले आहे. मानवी हस्तक्षेपामुळे बिबट्यांवर विस्थापित होण्याची वेळ येते. त्यातूनच माता आणि बछड्यांची ताटातूट होण्याचे प्रसंग घडतात. अशाच एका दुरावलेल्या बछड्याची आणि मादीची पुनर्भेट घडवून आणण्यात वनविभाग व इको-एको फाउंडेशनला यश आले आहे. विहिरीत पडलेला बछडा यशस्वी रेस्क्यू करून अवघ्या वीस मिनिटांत आईच्या कुशीत सुखरूप परतला.

नाशिक प्रादेशिक वनपरिक्षेत्रातील सय्यदपिंप्री येथील दीपक शांताराम ढिकले यांच्या मालकीच्या मालकी क्षेत्रातील ४९० मधील विहिरीत दोन महिन्यांचा बछडा पडला होता. घटनेची माहिती वनकर्मचाऱ्यांसह इको-एको फाउंडेशनच्या स्वयंसेवकांनी घटनास्थळी धाव घेऊन बछड्याची विहिरीतून सुखरूप सुटका केली. बछडा सुदृढ असल्याची खात्री पटल्यानंतर पुनर्भेटीची प्रक्रिया सुरू झाली.

ज्या ठिकाणी बछडा आढळून आला होता त्या परिसराची पाहणी करून बछड्याला त्याच ठिकाणी सायंकाळी टाेपलीखाली ठेवण्यात आले. लाइव्ह कॅमेरा लावून मादी बिबट व बछड्याच्या हालचालीवर नजर ठेवण्यात आली.

मादी आल्यानंतर टोपली उचलून बछड्याची सुटका करण्यात आली. परिसरात कोणी नसल्याचा तसेच सुरक्षित वातावरण असल्याचा अंदाज घेत मादीने बछड्यासह नैसर्गिक अधिवासात प्रस्थान केले. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. अवघ्या पंधरा दिवसांचा बछडा सुखरूप आईच्या कुशीत विसावल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

हेही वाचा :

Back to top button