नागपूर : उपराजधानीत थंडी बेपत्ता, हिवाळ्यात उन्हाळ्याचा अनुभव | पुढारी

नागपूर : उपराजधानीत थंडी बेपत्ता, हिवाळ्यात उन्हाळ्याचा अनुभव

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : नागपुरात थंडी अचानक बेपत्ता झाल्याचे आढळून येत आहे. गेल्या दोन दिवसांपासून येथे ढगाळ वातावरण आहे. 10 ते 12 डिसेंबर दरम्यान विदर्भात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यावर पावसाचे सावट होते. मात्र, पावसाच्या रिमझिम सरी वगळता पावसाने दिलासा दिला. या निमित्ताने ढगाळ वातावरण असल्याने थंडी बेपत्ता झाली आहे. तापमान जवळपास दहा अंशाने वाढले असल्याने उबदार कपडेही विश्रांती घेत आहेत. तापमान वाढल्याने हिवाळा की उन्हाळा असा संभ्रम सध्या निर्माण झाला आहे.

वर्धा येथे मंगळवारी विदर्भातील सर्वाधिक 22.4 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली तर नागपुरात 21.4 अंश तापमान होते. अकोला येथे सर्वाधिक 31.8 अंश तापमान होते. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे अनेक राज्यांमध्ये पावसाची हजेरी लागत आहे. विदर्भात सुद्धा पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. अद्याप पाऊस झाला नसला तरी ढगाळ वातावरण यामुळे तापमानात वाढ झाली आहे. काही दिवस हीच स्थिती राहील असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. 16 डिसेंबरपासून तापमान हळूहळू कमी होत 19 डिसेंबर अर्थात हिवाळी अधिवेशनापर्यंत उपराजधानीत पुन्हा गुलाबी थंडी परतेल असा अंदाज आहे.

हेही वाचा

Back to top button