धुळे : मुंबई आग्रा महामार्गावरील तिहेरी अपघातात दोन युवकांचा मृत्यू | पुढारी

धुळे : मुंबई आग्रा महामार्गावरील तिहेरी अपघातात दोन युवकांचा मृत्यू

धुळे : पुढारी वृत्तसेवा

धुळे शहरालगत मुंबई – आग्रा महामार्गावरील वरखेडी फाट्याजवळ झालेल्या तिहेरी अपघातात महिंद्रा कंपनीच्या दोन कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला. तर इतर दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

धुळे शहरातील मुंबई – आग्रा महामार्गावरील वरखेडी फाट्यावर ट्रक नादुरुस्त झाल्याने ट्रक दुरुस्तीसाठी महिंद्रा कंपनीचे दोघे मेकॅनिक गेले होते. नादुरुस्त ट्रकच्या काही अंतरावरच दुसरा आणखी एक ट्रक उभा होता. ट्रक दुरुस्तीचे काम महामार्ग येथे मेकॅनिकसह अन्य तीघे करत होते. यावेळी मालेगावकडून धुळ्याकडे भरधाव येत असलेल्या ट्रकने पुढील ट्रकला जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये ट्रकने काही अंतरावर उभे असलेल्या दुरुस्ती काम करणाऱ्या ट्रकला जोरदार धडक दिली. यात मेकॅनिकल आणि त्याचा सहकारी रस्त्यावर दूरवर फेकले गेले. त्यात गंभीर जखमी झाल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच आझादनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील आणि कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. मयत आणि गंभीर अशा चौघांना तातडीने हिरे रुग्णालयात हलवण्यात आले. दरम्यान, डॉक्टरांनी विजय पाटील आणि रमाकांत पाटील (दोघे रा. अवधान) यांना मयत घोषित केले. इतर दोघे गंभीर जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघात झालेल्या महामार्गावर वाहतूक विस्कळीत झाली होती. गंभीर जखमींपैकी एकाची ओळख पटली असून त्याचे नाव ज्ञानसिंग भावर असुन तो मध्यप्रदेश मधील रहिवाशी आहे. तर एकाची ओळख अद्याप पटू शकलेली नसल्याचे प्रमोद पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा:

Back to top button