नाशिक : नॅचरल गॅस कंपनीकडून शहरात पुन्हा खोदकाम | पुढारी

नाशिक : नॅचरल गॅस कंपनीकडून शहरात पुन्हा खोदकाम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीकडून शहरासह उपनगरांमध्ये गॅस पाइपलाइन टाकण्यासाठी मोठ्या प्रमाणावर रस्ते खोदण्यात आल्याने ऐन पावसाळ्यात नागरिकांना खड्ड्यांमधून वाटचाल करावी लागली. त्यानंतर आता रस्त्यांची बऱ्यापैकी डागडुजी होत नाही, तोच संबंधित कंपनीमार्फत पुन्हा रस्त्यांलगतचे खोदकाम सुरू करण्यात आल्याने नागरिकांना खड्डे आणि धुळीला सामोरे जावे लागत आहे.

शहरात एमएनजीएल कंपनीला महापालिकेने एकूण ३८ ठिकाणी गॅस पाइपलाइन टाकण्यासाठी रस्ते खोदकामास परवानगी दिली आहे. ही ३८ कामे मिळून एकूण २०५ किमी गॅस पाइपलाइन टाकण्याकरिता रस्ते खोदकामास परवानगी देण्यात आली आहे. त्यापैकी आतापर्यंत १६५ किमी लांबीचे खोदकाम करून पाइपलाइन टाकण्यात आली आहे. त्याकरिता ७८ कोटी १३ लाख ५३ हजार २८४ रुपये रोड रिस्टोरेशनचे शुल्क मनपाकडे जमा करण्यात आले आहे. शहरातील मुख्य परिसरासह उपनगरांमध्येही कंपनीमार्फत रस्त्यांलगत पाइपलाइनसाठी खोदकाम करण्यात आले. परंतु, हे खोदकाम वेळीच न बुजविल्याने वाहनधारकांना अपघातांना सामाेरे जावे लागले. अनेक ठिकाणी महापालिकेचे तसेच नागरिकांचे नळकनेक्शन, ड्रेनेजच्या लाइन्स तुटल्या. त्यामुळे नागरिकांना आर्थिक नुकसानीलाही सामोरे जावे लागले. पावसाळ्याआधी खोदाई केलेली कामे पूर्ववत करणे गरजेचे असताना, त्याकडे मनपाच्या बांधकाम विभागाकडून आणि कंपनीकडूनही दुर्लक्ष करण्यात आल्याने रस्त्यातील खड्ड्यांसह रस्त्याच्या कडेलाच खोदकाम केलेल्या लाइनमध्ये पडून वाहनधारकांना दुखापत झाली. याबाबत लोकप्रतिनिधींसह नागरिकांकडून ओरड होऊन तक्रारी झाल्याने त्याची दखल घेत आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी कामे थांबविण्याबरोबरच खोदाई झालेली कामे तातडीने दुरुस्त करण्याचे आदेश दिले होते. या आदेशाचे पालन होत नाही, तोच आता मनपाने पुन्हा महाराष्ट्र नॅचरल गॅसला खोदाईसाठी परवानगी दिल्याने नागरिकांना पुन्हा खड्ड्यांना सामाेरे जावे लागणार आहे.

नाशिक पूर्वमध्ये सात कामे असून, ४६.९५२ किमीपैकी ३५.७ किमी काम पूर्ण झाले आहे. त्यासाठी १९ कोटी ६९ लाख ७७ हजार ७७१ रुपये रोड रिस्टोरेशन चार्जेस भरण्यात आले आहे. नाशिक पश्चिम विभागात दोन कामे होती. ५.५८ किमी लांबीचे खोदकाम पूर्ण होऊन पाइपलाइन टाकण्यात आली आहे. त्यासाठी तीन कोटी चार लाख ५७ हजार ८७२ रुपये खर्च जमा करण्यात आला आहे. पंचवटी विभागातील चार कामे मिळून ११.७८२ इतक्या लांबीच्या कामांपैकी ११.३ किमीचे खोदकाम पूर्ण झाले आहे. त्यासाठी तीन कोटी २८ लाख ४० हजार ६८३ रुपये खर्च मनपाकडे भरला आहे. सातपूर विभागात आठ कामांना परवानगी देण्यात आली आहे. त्या अनुषंगाने ४४.९२४ किमी कामापैकी ३६.९ किमी लांबीचे खोदकाम पूर्ण झाले आहे. त्यासाठी ११ कोटी ५५ लाख ८८ हजार ३०० रुपये मनपाच्या तिजोरीत कंपनीने जमा केले आहेत.

नाशिकरोडला सर्वाधिक रस्ते खोदाई

नाशिकरोड विभागात एकूण ११ कामांना परवानगी दिली आहे. त्यानुसार ४८.७७६ किमी रस्ते खाेदकामांपैकी ३७.९ किमीचे रस्ते खोदकाम काम पूर्ण झाले आहे. त्याकरिता २५ कोटी १५ लाख ८५ हजार ६१९ रुपये शुल्क भरण्यात आले आहे. सिडको विभागासाठी सहा कामांना परवानगी दिली आहे. ४७.९८१ किमीपैकी ३८.४५० किमीचे खोदकाम पूर्ण झाले आहे. या बदल्यात कंपनीने १५ कोटी ३९ लाख तीन हजार ३९ रुपये भरले आहेत.

हेही वाचा:

Back to top button