जेऊर फाटा रेल्वेगेट राहणार 36 तास बंद | पुढारी

जेऊर फाटा रेल्वेगेट राहणार 36 तास बंद

वाल्हे; पुढारी वृत्तसेवा : जेऊर – नीरा मार्गावरील पिंपरे खुर्द हद्दीतील जेऊर फाटा येथील रेल्वे गेट मंगळवारी (दि.13) ते बुधवार (दि.14) सायंकाळी 7 वाजेपर्यंत (36 तास) वाहतुकीसाठी बंद राहणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे सांगण्यात आले आहे. नीरा- जेऊर, मांडकी, वीर, सारोळा या मार्गावर मिरज- पुणे रेल्वे लाईनवरील जेऊर फाटा येथे रेल्वेचे 28 नंबर किलोमीटर 80 / 4-5 गेट आहे.

हे गेट रेल्वे मार्गाचे काम करण्यासाठी व निरीक्षणासाठी मंगळवार दि. 13 डिसेंबर रोजी सकाळी 07 ते बुधवार दि.14 डिसेंबर सायंकाळी 07 वाजेपर्यंत बंद राहणार असल्याची माहिती रेल्वेच्या जनसंपर्क अधिकार्‍यांनी मांडकी व जेऊर ग्रामपंचायतीला दिली आहे. यादरम्यान जेऊर, मांडकी, लपतळवाडी, वीर, सारोळा येथील नागरिकांनी वाहतुकीसाठी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे सांगण्यात आले आहे.

अतिवृष्टीनंतर प्रशासनाच्या निर्णयाचा फटका
मांडकी, जेऊर, लपतळवाडी , वीर ते सारोळा या ऊस बागायत पट्ट्यातून श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याकडे ऊस वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. आगोदरच अतिवृष्टीमुळे शेत जमिनिला वाफसा लवकर न आल्याने व ऊसतोडणी कामगार कमी आल्याने, कारखान्याचा गळीत हंगाम संथ गतीने सुरु आहे. ऊसतोडणीही लांबल्या आहेत. यातच आता सलग 36 तास वाहतूक बंद राहिल्याने या परिसरातील शेतकर्‍यांचे नुकसान होणार आहे.

Back to top button