सावानाचा स्तुत्य उपक्रम : ‘एसएमएस’द्वारे मिळणार सर्व पुस्तकांची माहिती | पुढारी

सावानाचा स्तुत्य उपक्रम : ‘एसएमएस’द्वारे मिळणार सर्व पुस्तकांची माहिती

नाशिक : दीपिका वाघ
सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने वाचक सभासदांना त्यांना हव्या असणार्‍या सर्व पुस्तकांची माहिती आता ‘एसएमएस’द्वारे मिळणार आहे. येत्या पंधरा दिवसांत या उपक्रमाला प्रारंभ होणार आहे. सार्वजनिक वाचनालयाचे आजपर्यंत 10 हजार सभासद आहेत. वाचनालयात लाखोंच्या संख्येने ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. त्यामुळे वाचकांची वाचनालयात नेहमीच वर्दळ बघायला मिळते. शहराच्या विविध भागांत सभासद विखुरलेले असल्यामुळे वाचक सभासदांना हवे असणारे पुस्तक मिळाले नाही, तर त्यांचा हिरमोड होतो. यासाठी आता ‘सावाना’च्या वाचक सभासंदाना ओपेक्स सिस्टिमद्वारे घरबसल्या वाचनालयात उपलब्ध असणार्‍या सर्व पुस्तकांची माहिती एसएमएसद्वारे मिळणार आहे. पुस्तकांच्या एकूण किती प्रती शिल्लक आहेत आणि त्या कधीपर्यंत उपलब्ध होऊ शकतात, ही सर्व माहिती वाचकांना आता घरबसल्या मिळणार आहे. या योजनेची सुरुवात येत्या पंधरा दिवसांत होणार असल्याचे सावानाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

सावाना आता सभासदांच्या दारी…
वाचक सभासदांना विनंती करून त्यांच्याकडून नाममात्र शुल्क आकारून प्रत्येक आठवड्यातील एक वार आणि एक प्रभाग ठरवून वाचकांना हवी असणारी पुस्तके त्यांच्या प्रभागात उपलब्ध होतील. यासाठी वाचनालयाची खास गाडी असणार आहे, अशी योजना भविष्यात अमलात आणण्याचा सावानाचा विचार आहे. याबाबत सध्या सर्वेक्षण सुरू असून, वाचकांना लवकरच वाचनालय त्यांच्या प्रभागात लवकरच उपलब्ध होईल.

सार्वजनिक वाचनालयाच्या वाचक सभासदांना नेहमीच दर्जेदार सुविधा देण्यात येतात. वाचकांची गरज ओळखून त्यांचा हिरमोड होऊ नये. यासाठी नवीन योजना सुरू केली जाणार आहे. यामुळे वाचकांना हवे असणारे पुस्तक पाहिजे तेव्हा उपलब्ध होईल. – डॉ. धर्माजी बोडके, प्रमुख सचिव, सावाना.

हेही वाचा:

Back to top button