नाशिक : शेतीच्या वादातून ८ जणांविरुद्ध ‘ॲट्रॉसिटी’ | पुढारी

नाशिक : शेतीच्या वादातून ८ जणांविरुद्ध 'ॲट्रॉसिटी'

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा

तालुक्यातील दहिवाडी येथे शेतजमिनीत येऊन हरभरा पिकाची नुकसान करत मारहाण व जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात ८ जणांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. यासंदर्भात शरद दामू धनराव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कचरू रावसाहेब संधान, अजित भागवत गाढे, सोपान भाऊसाहेब आरोटे, बाळासाहेब माधव संधान, गणपत बहिरू आरोटे यांच्यासह तीन अनोळखी इसमांविरोधात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यानुसार जातीवाचक शिवीगाळ आणि मारहाण केल्याप्रकरणी ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी शरद दामू धनराव हे दहिवाडी येथे वास्तव्यास असून, विवेकानंद रामकृष्ण जगदाळे यांच्या कोने, आडगाव आणि दहिवाडी येथील शेत जमिनीची देखभाल करतात. दहिवाडी येथील गट नं. 109 व 116 येथील शेतात धनराव व त्याचा मित्र साहेबराव किसन पिंपळे या दोघांनी मिळून हरभरा पीक केले असू,न या पिकाचे आणि शेताचे संरक्षण करण्याच्या हेतूने धनराव आणि त्याचा मित्र साहेबराव पिंपळे यांनी त्यांना राहण्यासाठी शेतात निवारा आणि गायीसाठी गोठा उभारण्याचे काम हाती घेतले होते. 10 जानेवारी 2022 रोजी सायंकाळी 5 च्या सुमारास दहिवाडी येथील अजित गाडे, कचरू संधान, सोपान आरोटे, बाळासाहेब संधान, गणपत आरोटे यांच्यासह तीन अनोळखी इसम अशा आठ जणांनी दुचाकीवरून जगदाळे यांच्या शेतात घुसून हरभरा पिकाचे नुकसान केले. त्यावेळी फिर्यादी व त्याच्या मित्राने त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी जातीवाचक शिवगाळ करीत मारहाण करण्यास सुरुवात केली. याशिवाय आरोपींनी फिर्यादीसह त्याचा मित्र साहेबराव पिंपळे व शेताचे मालक विवेकानंद जगदाळे यांना जीवे मारण्याची धमकी दिली.

या घटनेची माहिती शेतजमिनीचे मालक विवेकानंद जगदाळे यांना समजल्यानंतर त्यांनी सिन्नर एमआयडीसी पोलिस ठाणे, आडगाव पोलिस ठाणे व मुसळगाव पोलिस ठाण्यात तसेच निफाड ग्रामीण पोलिस ठाण्यात लेखी तक्रार अर्ज दिले होते. त्यानंतर जिल्हा व सत्र न्यायालय नाशिक येथे आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल होण्यासाठी अर्ज केला होता. त्यावर न्यायालयाने याबाबत कारवाई करण्याचे आदेश सिन्नरच्या एमआयडीसी पोलिस ठाण्यास दिले होते. त्यानुसार बुधवारी एकूण ८ संशयितांविरुद्ध जातीवाचक शिवीगाळ आणि मारहाण केल्याप्रकरणी ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपअधीक्षक सोमनाथ तांबे करीत आहेत.

हेही वाचा :

Back to top button