दै. पुढारी इम्पॅक्ट : बसवाहकांना बोनस दिला नाही; सिटीलिंक ठेकेदाराला मिळाली नोटीस | पुढारी

दै. पुढारी इम्पॅक्ट : बसवाहकांना बोनस दिला नाही; सिटीलिंक ठेकेदाराला मिळाली नोटीस

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
मनपाच्या सिटीलिंक बसवाहकांना वेतन आणि बोनसही अदा केले जात नसल्याने वाहकांमधून ठेकेदाराविषयी असंतोष व्यक्त केला जात आहे. परंतु, संबंधित कंपनीच्या आडून राजकीय ठेकेदारांच्या हाती ठेक्याच्या चाव्या असल्याने राजकीय दबावापोटी वाहक गपगुमान काम करत आहेत. दरम्यान, बोनस आणि वेतन अदा न करणार्‍या मॅक्स सिक्युरिटीज या कंपनीला मनपाने नोटीस बजावत ठेका रद्द का करू नये, असा जाब विचारला आहे. ठेकेदार कंपनीला आतापर्यंत दोनदा नोटीस बाजवली आहे.

महापालिकेच्या नाशिक महानगर परिवहन महामंडळाच्या सिटीलिंक बसेस चालविण्यासाठी चालक आणि वाहकांचा ठेका देण्यात आला आहे. त्यापैकी बसेस पुरविणार्‍या ठेकेदाराकडून चालक पुरविण्यात आले असून, त्यांच्या वेतनाचा विषय पुढे आलेला नाही. मात्र, वाहक पुरविणार्‍या ठेकेदार कंपनीकडून आजवर कधीही वेळेत वेतन अदा केले जात नसल्याने वाहक कर्मचार्‍यांची सहनशीलता संपली आहे. त्यामुळेच गेल्या महिन्यात वाहकांनी सिटीलिंक कार्यालयासमोर आंदोलन करत काम बंदचा इशारा दिला होता. ठेकेदारांकडून कर्मचार्‍यांची आर्थिक पिळवणूक होत असल्याने कर्मचारी नाराज आहेत. मॅक्स सिक्युरिटीज या दिल्लीस्थित कंपनीच्या नावाखाली राजकारणातील दोघेच या ठेक्याचा कारभार पाहत असल्याने तसेच त्यांच्याकडून कर्मचार्‍यांवर दबाव आणला जात असल्याने मनपानेही हात बांधले गेले आहेत. त्यामुळे नोटीस बजावण्याव्यतिरिक्त मनपाकडून ठोस अशी कार्यवाही केली जात नाही. मनपा आणि ठेकेदाराबरोबर झालेल्या करारानुसार प्रथम ठेकेदाराने कर्मचार्‍यांना बोनस आणि वेतन अदा करावयाचे आहे, असे असताना कर्मचार्‍यांना दिवाळीत बोनस मिळावा म्हणून मनपाने तीन महिन्यांचा बोनस म्हणून दहा लाख रुपये ठेकेदाराला अदा केले. त्यानुसार कंपनीने कर्मचार्‍यांना दिवाळी बोनस अदा करणे अपेक्षित होते. परंतु, त्यानंतरही कंपनीने बोनस अदा न करता आणखी नऊ महिन्यांच्या बोनस रकमेची मनपाकडे मागणी केली आहे. परंतु, करारानुसार ठेकेदारानेच आधी बोनस देऊन त्याचे देयक मनपाला सादर करावयाचे आहे. बोनस अदा न केल्याने मनपाने आता ठेकेदाराला सलग दुसर्‍यांदा नोटीस बजावली असून, तिसर्‍या नोटीस नंतर ठेकेदाराचा ठेका रद्द करण्याची शिफारस केली जाणार असल्याचे सिटीलिंकतर्फे सांगण्यात आले.

ठेकेदार अन् संघटना एकच
ठेेकेदार कंपनीच्या नावाखाली राजकीय पक्षाशी संबंधित दोन पदाधिकार्‍यांकडून वाहकांचा कारभार पाहिला जातो. याच दोन पदाधिकार्‍यांकडील वाहक सिटीलिंकचे काम पाहत असून, वेतन व बोनस अदा न केल्याने कर्मचार्‍यांनी आंदोलन केले. मात्र, दबाव टाकून ते दडपण्यात आले. या कर्मचार्‍यांनी पुन्हा आंदोलन करू नये आणि कुणा संघटनेशी ते जोडले जाऊ नये म्हणून संबंधित एका राजकीय ठेकेदाराच्याच संघटनेत या कर्मचार्‍यांना सामावून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु, ठेकेदार आणि संघटना एकाच व्यक्तीच्या असल्याने कर्मचार्‍यांचे प्रश्न मार्गी कसे लागणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

ठेकेदाराबाबत या आहेत तक्रारी….
नियमानुसार वेळीच वेतन न देणे
किमान समान वेतन न देणे
दोन महिन्यांचे वेतन शिल्लक ठेवले जाते.
दिवाळीपासून कर्मचार्‍यांना वंचित ठेवणे
कर्मचार्‍यांना वैद्यकीय रजा न देणे
साप्ताहिक सुटीचा मोबदला न देणे
वाहकांचा आयडी मनमानीपणे बंद करणे
वाहकांकडून अवाजवी दंड आकारणे

मॅक्स सिक्युरिटीज कंपनीला दुसर्‍यांदा नोटीस बजावली आहे. मनपाने बोनस व वेतनाची रक्कम ठेकेदाराला अदा केलेली आहे. वाहकांनी पुन्हा आंदोलन केल्यास अंतिम नोटीस बजावली जाईल. – मिलींद बंड, महाव्यवस्थापक, सिटीलिंक कंपनी.

हेही वाचा:

 

Back to top button