

जळगाव: पुढारी वृत्तसेवा
भाजप नेते तथा केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे व आमदार प्रसाद लाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बेताल वक्तव्य केल्याचे राज्यभरात पडसाद उमटत आहेत. भाजपच्या दोघा नेत्यांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. राष्ट्रवादीच्या वतीने रावसाहेब दानवे व प्रसाद लाड यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून फाशीवर लटकवण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात आले. भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी बेताल वक्तव्य करणे बंद न केल्यास त्यांना रस्त्यावर फिरू दिले जाणार नाही, असा इशारा देखील देण्यात आला. भाजप छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलून दंगली घडविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप राष्ट्रवादीने यावेळी केला आहे. आंदोलनप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस नामदेव चौधरी, राष्ट्रवादीचे जळगाव महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी, राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष रिंकू चौधरी, राजू मोरे, मझर पठाण, इब्राहिम तडवी, रमेश बहारे, रहीम तडवी, भगवान सोनवणे, रफिक पटेल, कुंदन सूर्यवंशी, अशोक सोनवणे, विशाल देशमुख, अनिरुद्ध जाधव, दुर्गश पाटील, ललित नारखेडे, खलील शेख, नईम खाटीक, प्रवीण सुरवाडे, संजय जाधव, उमेश सूर्यवंशी, जुबेर शेख, सचिन साळुंखे, हितेश जावळे, योगेश साळी आदी उपस्थित होते.