32 कोटी 80 लाख वर्षांपूर्वीचा ‘महाशिकारी’! | पुढारी

32 कोटी 80 लाख वर्षांपूर्वीचा ‘महाशिकारी’!

वॉशिंग्टन : संशोधकांनी तब्बल 32 कोटी 80 लाख वर्षांपूर्वीच्या अशा प्राण्याचे जीवाश्म शोधले आहेत जो टी-रेक्स डायनासोरप्रमाणेच एक खतरनाक शिकारी होता. 6 फूट लांबीच्या या मगरीसारख्या प्राण्याला ‘महाशिकारी’ म्हणता येईल अशी क्षमता होती. हा गोड्या पाण्यातील ‘महाशिकारी’ होता. हे प्राणी वेगाने मोठे होत होते.

चार पायांच्या या पृष्ठवंशीय प्राण्याला ‘टेट्रापॉड’ असे नाव आहे. सुरुवातीच्या कार्बोनीफेरस काळातील हे प्राणी आहेत. त्यांचे शास्त्रीय नाव ‘वॉचिरिया डेल्टी’ असे आहे. ‘व्हॉट चीयर’ या आयोवामधील गावावरून हे नाव ठेवण्यात आले आहे. या गावात अशा प्राण्याची अनेक जीवाश्मे सापडली आहेत. एके काळी याठिकाणी अनेक सरोवरे होती. या सरोवरांमध्येच हे प्राणी राहत होते. ते 6.5 फूट म्हणजेच 2 मीटरपर्यंत वाढत असत. शिकागोच्या फिल्ड म्युझियम आणि शिकागो युनिव्हर्सिटीतील संशोधकांनी याबाबतचे संशोधन केले आहे. त्याची माहिती ‘कम्युनिकेशन्स बायोलॉजी’ या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या प्राण्याचे 375 जीवाश्म नमुने सापडले आहेत हे विशेष. त्यापैकी काही जवळजवळ पूर्ण सांगाडा असलेली आहेत.

Back to top button