नाशिक : अखेर शासकीय जमिनीवरील अतिक्रमण हटविले | पुढारी

नाशिक : अखेर शासकीय जमिनीवरील अतिक्रमण हटविले

नाशिक (सुरगाणा) : पुढारी वृत्तसेवा
येथील शासकीय वसतिगृहाशेजारील अनधिकृत बांधकामाचे अतिक्रमण उपविभागीय अधिकारी विशाल नरवाडे यांच्या उपस्थितीत पोलिस बंदोबस्तात काढण्यात आले.

सर्वोच्च न्यायालयाने अकरा वर्षांपूर्वी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने सुमोटो याचिकेवर दिलेल्या आदेशानुसार सध्या गायरान जमिनीवरील अतिक्रमणे काढण्यासाठी हालचाली सुरू आहेत. सुरगाणा शहरासह तालुक्यातील गायरान जमिनीवरील अतिक्रमणधारकांना गाव, पाडा, वाडी, वस्तीवरील अतिक्रमणधारकांना नोटीस बजावल्याने अतिक्रमण चिंताग्रस्त झाले आहेत. दरम्यान, येथील नवीन शासकीय वसतिगृहालगत शासकीय जमिनीवर करण्यात आलेले अतिक्रमण सकाळच्या सुमारास सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी विशाल नरवाडे, तहसीलदार सचिन मुळीक, पोलिस निरीक्षक संदीप कोळी यांच्या उपस्थितीत जेसीबीच्या सहाय्याने काढण्यात आले. पत्र्यांचे नुकसान होऊ नये म्हणून सिमेंट पत्रे काढून घेण्यात आल्यानंतर हे अतिक्रमण काढण्यात आले. पुन्हा अतिक्रमण होऊ नये म्हणून तार कम्पाउंडचे कामही हाती घेण्यात आले आहे.

सदर जागेवर गोशाळा, गुरुकुल सुरू करण्यासाठी एक वर्षापासून शासनाकडे जागा मागणीसाठी पत्रव्यवहार सुरू होता. लोकांकडून मिळालेल्या देणगीतून तात्पुरते गायींचे शेड उभारून कुटी तयार करण्यात आली होती. अतिक्रमण पाडल्यामुळे देणगीतून मिळालेल्या पैशांचे चीज झाले नाही. गोशाळेसाठी शासनाने पर्यायी जागा उपलब्ध करून दिली तर गोशाळा चालवणे सोपे जाईल. – श्री रमणगिरी महाराज, सुरगाणा.

हेही वाचा:

Back to top button