धुळे : महामार्गावर ट्रक चालकांची लूट करणाऱ्या टोळीतील सात जण ताब्यात

धुळे : महामार्गावर ट्रक चालकांची लूट करणाऱ्या टोळीतील सात जण ताब्यात
Published on
Updated on

धुळे : पुढारी वृत्तसेवा

महिलेला मदत देण्याच्या बहाणावरुन महामार्गावरून जाणाऱ्या ट्रकचालकांची लूट करणाऱ्या टोळीस बुधवारी (दि.30) आझादनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. टोळीतील एक महिला आणि सहा पुरुष सदस्यांना पोलिसांनी अटक केली असून त्यांचा इतर गुन्ह्यातील सहभाग तपासला जाणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी दिली.  अटक केलेल्या आरोपींची नावे तुर्त गोपनीय ठेवण्यात आली आहेत.

धुळे जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्गांवर वाहन चालकांना मध्यरात्री तसेच भल्या पहाटे लुटण्याचे प्रकार वाढले होते. यापार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात ट्रक चालकावर दगडफेक करण्यात आली. त्यामुळे संबंधित ट्रक अपघातग्रस्त होताच ट्रकचालकाची रोकड आणि अन्य वस्तू चोरण्यात आल्याची घटना घडलेली असताना संजय बारकुंड, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने महामार्गालगत असणाऱ्या पोलीस ठाण्यातील प्रभारी अधिकाऱ्यांनी गस्त वाढवली. यामध्ये बुधवारी, दि.30 पहाटे एका ट्रकचालकाची लूट झाल्याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने ट्रकचालकाला ताब्यात घेत चौकशी केली. ट्रकचालक ताहीर खान रियाज खान हा आयशर ट्रक (एम एच 18 बीएच 2400) घेऊन औरंगाबाद येथून इंदूरकडे जात होता. यावेळी धुळे शहरालगत असलेल्या मुंबई आग्रा महामार्गावरील उड्डाणपूलाजवळ एका महिलेने मदत मिळवण्यासाठी ट्रक थांबवत हात केला. ट्रकचालकाने ट्रक थांबवतााच दहा ते अकरा जणांनी येऊन ट्रकचालक खान यांना बेदम मारहाण केली. त्यांच्या डोळ्यात मिरचीची पावडर टाकून दोरीने त्यांचे हातपाय बांधले. यानंतर त्यांच्याकडील रोकड आणि मोबाईल हा हिसकावून घेतला.

ट्रकचालकाची लूट होत असल्याची माहिती कळताच आझादनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रमोद पाटील यांच्यासह सहायक पोलिस निरीक्षक दीपक पावरा यांच्या पथकाने महामार्गावर महिलेचा शोध घेतला असता सदर महिला अन्य वाहनातून पसार होण्याचा प्रयत्न करत असतानाच ताब्यात घेतले. महिलेची चौकशी केली असता लूट करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. पोलिसांनी तातडीने महिलेसह सहा जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेला चाकू, लोखंडी पाईप, लाकडी दांडके आणि चार दुचाकी असा 1 लाख 41 हजारचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या संदर्भात बारकुंड यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना  सांगितले की, महामार्गावरील लूट करणारी टोळी लवकरच गजाआड करण्यात येणार आहे. तसेच गेल्या आठवड्यात महामार्गावर अशाच पद्धतीने ट्रक चालकाची लूट करण्याचा प्रयत्न झालेल्या घटनेतील ट्रकचालक जखमी असून तो रुग्णालयात उपचार घेत आहे. अटक केलेल्या टोळीची ओळख परेड करण्यात येणार असून ट्रकचालकाच्या माहितीनुसार आणखी गुन्हे उघडकीस येणार असल्याची माहिती देखील बारकुंड यांनी दिली. यावेळी त्यांच्या समवेत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक हेमंत पाटील उपस्थित होते.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news