दादागिरी मोडणार, गुलाबराव पाटलांचं डिपॉझिट जप्त करणार : शरद कोळी | पुढारी

दादागिरी मोडणार, गुलाबराव पाटलांचं डिपॉझिट जप्त करणार : शरद कोळी

जळगाव, पुढारी वृत्‍तसेवा : जिल्हाबंदी करून आवाज दाबण्याची दादागिरी सहन करणार नाही. २०२४ ला निवडणूक लढून राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटलांचं डिपॉझिट जप्त करणार, असा इशारा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते, युवसेनेचे राज्य विस्तारक शरद कोळी यांनी दिला.  या वेळी त्‍यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांच्‍यावर जोरदार हल्लाबोल केला.

महाप्रबोधन यात्रेत जिल्हाबंदी असलेले शरद कोळी हे आज धरणगाव पोलीस ठाण्यात हजर झाले. कोळी हे आज धरणगाव पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात अटकपूर्व जामिनासाठी आले होते. यादरम्यान माध्यमांशी बोलताना ते म्‍हणाले, आगामी निवडणूक ही मंत्री गुलाबराव पाटील यांच्या विरोधात लढणार आहे.  गुलाबराव पाटील यांचे 30 ते 40 वर्षाचं राजकारण हे दादागिरीच्या जीवावर चालले आहे. मंत्रिपदाचा दुरुपयोग करत मंत्री त्‍यांनी माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला, असा आरोप शरद कोळी यांनी केला.

शरद कोळी नेमकं काय म्हणाले? 

2024 मध्ये गुलाबरावांची दादागिरी मोडून काढण्यासाठी आम्ही शहीद झालो तरी चालेल, पण आम्ही आता थांबणार नाही. 30-40 वर्षापासून इथे दादागिरी चालू आहे. कोळी समाजाच्या जीवावर, शिवसेनेच्या जीवावर निवडून येऊन दादागिरी सुरु आहे. तुम्ही मंत्रिमंडळाचा गैरवापर करुन, गोरगरिबांना त्रास देताय, ही दादागिरी मोडून काढणार. त्यासाठी 2024 मध्ये मी गुलाबरावांविरुद्ध निवडणुकीला उभं राहणार, त्यांचा पराभव करणार, असा निर्धार केला असल्‍याचे शरद कोळी यांनी या वेळी  सांगितले.

हेही वाचा 

 … म्हणून विक्रम गोखले यांनी एकदा नव्हे तर दोन वेळा घेतला होता अभिनय क्षेत्रातून संन्यास, वाचा सविस्तर

सोलापूर: ॲड.सदावर्तेंवर संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून शाईफेक

औरंगाबाद : पदवीधर अधिसभा निवडणुकीसाठी पहिल्या चार तासात केवळ १५ टक्के मतदान

Back to top button