नाशिकमध्ये शिंदे गटात होणार मोठे इनकमिंग; ठाकरे गटाला हादरा | पुढारी

नाशिकमध्ये शिंदे गटात होणार मोठे इनकमिंग; ठाकरे गटाला हादरा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

येत्या काही दिवसांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील अनेक माजी नगरसेवकांसह पदाधिकारी मोठ्या प्रमाणावर बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. असे घडल्यास नाशिकमध्ये ठाकरे गटाला मोठा हादरा बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटात अधिकाधिक प्रवेश सोहळे घडवून आणण्यासाठी पालकमंत्री दादा भुसे तसेच खासदार हेमंत गोडसे यांच्याकडून प्रयत्न केले जात आहेत. तसेच नाशिकमध्येदेखील ठाकरे गटात अनेक नगरसेवक तसेच पदाधिकाऱ्यांचे थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चांगले संबंध आहेत. याच संबंधांच्या जोरावर येत्या काही दिवसांत शिंदे गटामध्ये अनेक मातब्बर लोकप्रतिनिधींचे इनकमिंग होण्याची दाट शक्यता आहे. नाशिकरोड, सिडको आणि सातपूर तसेच पंचवटी या विभागांतून जवळपास १२ ते १५ नगरसेवक शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता वर्तविली जात आहे. असे झाल्यास हा प्रवेश सोहळा ठाकरे गटाला मोठा हादरा देणारा ठरू शकतो.

आतापर्यंत माजी नगरसेवक प्रवीण तिदमे आणि श्यामकुमार साबळे यांनी शिंदे गटात प्रवेश केला असला, तरी त्यानंतर मात्र कोणताही मोठा प्रवेश झालेला नाही. त्यामुळे नाशिक शहरात शिंदे गटाला मरगळ आल्याचे चित्र आहे. एकीकडे नाशिक शहराच्या दृष्टीने पालकमंत्री आणि खासदार गोडसे यांच्याकडून बैठकांवर बैठका घेतल्या जात आहेत, तर दुसरीकडे मोठे इनकमिंग होत नसल्याने शिंदे गटालादेखील त्याची प्रतीक्षा आहे.

हेही वाचा :

Back to top button