खडकवासलातून शेतीला तीन आवर्तने देणार; कालवा समितीच्या बैठकीत निर्णय | पुढारी

खडकवासलातून शेतीला तीन आवर्तने देणार; कालवा समितीच्या बैठकीत निर्णय

पुणे; पुढारी वृत्तसेवा : खडकवासला प्रकल्पातून रब्बी व उन्हाळी अशी मिळून तीन आवर्तने देण्यात येणार आहेत. रब्बी हंगामाबरोबरच उन्हाळ्यातील पहिल्या टप्प्यातील हंगामासाठी कालवे सल्लागार समितीची बैठक शुक्रवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला. बैठकीस विरोधी पक्षनेते अजित पवार, आमदार राहुल कुल, सुनील शेळके, भीमराव तापकीर, चेतन तुपे, दिलीप मोहिते पाटील, अशोक पवार आदी उपस्थित होते.

खडकवासला प्रकल्पात सध्या 27.38 टीएमसी पाणीसाठा असून साठ्याची टक्केवारी 93.92 टक्के आहे. लाभक्षेत्रातील 18 तलावांमध्ये धरणाचे पाणी सोडून व कार्यक्षेत्रात झालेल्या पावसामुळे हे सर्व तलाव 100 टक्के भरले आहेत. या प्रकल्पातून जिल्ह्यातील इंदापूर, दौंड, हवेली आणि काही बारामती तालुक्यातील गावांना शेती तसेच नागरिकांना पिण्यासाठी पाणीपुरवठा केला जातो. पुणे महानगरपालिकेने अतिरिक्त पाणी वापर टाळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना हाती घ्याव्यात, अशी मागणी लोकप्रतिनिधींनी यावेळी केली.

पिण्यासाठी, ग्रामीण भागातील सिंचनासाठी तसेच औद्योगिक वापरासाठी पाणी वापराबाबत समतोल राखण्यासाठी प्रयत्न करावेत. महानगरपालिका आणि जलसंपदा विभागाने एकत्र बैठक घेऊन अतिरिक्त पाणी वापराचा प्रश्न सोडवण्याबाबत विचारविनिमय करावा, अशा सूचनाही पालकमंत्री पाटील यांनी केल्या. सध्या पाणी परिस्थिती पाहता खडकवासला प्रकल्पातून नवा मुठा उजवा कालव्याला 22 डिसेंबर रोजी रब्बीचे अवर्तन सोडण्याचे नियोजन असून, रब्बी आणि उन्हाळी हंगामासाठी योग्य नियोजन करून दोनऐवजी एकूण तीन आवर्तने सोडण्यात यावीत, अशा सूचना पाटील यांनी दिल्या आहेत.

पवना प्रकल्पाचे नियोजन
पवना धरणात 7.67 टीएमसी पाणीसाठा असून ते पिण्यासाठी, सिंचन तसेच औद्योगिक वापरासाठी पुरेसे आहे. रब्बी व उन्हाळी हंगामासाठी 15 जुलैपर्यंतचा पाणी वापर गृहीत धरता पाण्याचे योग्य नियोजन करण्यात आले आहे, असे सांगण्यात आले. भामा आसखेड धरणात पुरेसे पाणी असून धरणातून 2 वेळा नदीत पाणी सोडण्याचे ठरले. पाणी प्राधान्याने खेड तालुक्याला देण्याचा विचार करावा, अशी मागणी करण्यात आली. चासकमान प्रकल्पातून रब्बी हंगामात 22 डिसेंबरला आवर्तन सोडण्याचे ठरले.

अशी असणार तीन आवर्तने
खडकवासला प्रकल्पातून पहिले आवर्तन 25 डिसेंबर ते 28 फेब—ुवारी असे 65 दिवस असणार आहे. तर दुसरे आवर्तन 1 एप्रिल ते 15 मे (उन्हाळी आवर्तन)असे 45 दिवस राहणार आहे. मात्र आणखी एक आवर्तन देण्याची मागणी इंदापूर आणि दौंड तालुक्याचे आमदार दत्ता भरणे आणि राहुल कुल यांनी केली. त्यानुसार तिसरे आवर्तन देण्यात येणार आहे. तिसर्‍या आवर्तनासाठी पुढील बैठक आठ ते दहा दिवसात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत आमदार दत्ता भरणे आणि राहूल कुल यांच्यासोबत होणार आहे. खडकवासला धरण फुरसुंगी या भागापर्यंत भूमिगत होणार्‍या वाहिनीचे काम लवकर सुरू करावे, अशी मागणी दौड तालुक्याचे आमदार कुल यांनी या वेळी केली.

Back to top button