Nashik : मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला पालकमंत्र्यांनाच खो, शिंदे गटात धुसफूस | पुढारी

Nashik : मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला पालकमंत्र्यांनाच खो, शिंदे गटात धुसफूस

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राज्यात सत्ता स्थापन झाल्यानंतर ‘बाळासाहेबांची शिवसेना’ शिंदे गटाकडून विविध ठिकाणी आपली पकड मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. नाशिकमध्येही असे प्रयत्न पालकमंत्री दादा भुसे आणि खासदार हेमंत गोडसे यांच्याकडून होत असून, त्यात स्पर्धा पाहायला मिळत आहे. त्याचा प्रत्यय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नाशिकबाबतचे प्रश्न सोडविण्यासाठी बोलाविण्यात आलेल्या बैठकीत आला. या बैठकीला खुद्द पालकमंत्र्यांनाच निमंत्रित केले गेले नसल्याने शिंदे गटात अंतर्गत धुसफूस असलेली पाहावयास मिळत आहे.

सत्ता स्थापनेनंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी संपूर्ण राज्यात संघटना बांधणीचे प्रयत्न सुरू केले. यामध्ये मुख्य म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेलाच फोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी खासदार, आमदार यांच्या मदतीने शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकार्‍यांना संघटनेत आणण्यासाठी प्रयत्न होत आहेत. परंतु संघटना बळकटी तर सोडाच. मात्र, आहे त्या पदाधिकार्‍यांमध्येही आपसात पटत नसल्याचे दिसून येत असल्याने शिंदे गटातील राजकारण समोर आले आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे मंगळवारी (दि. 22) बैठक बोलाविण्यात आली होती. या बैठकीला पालकमंत्री म्हणून दादा भुसे उपस्थित असणे गरजेचे होते. त्या व्यतिरिक्त आमदारांनादेखील बोलावणे आवश्यक होते. मात्र, गुजरातमध्ये आमदार गेलेले असल्याने त्यांना येता आले नाही. मात्र, त्यांच्यापर्यंत बैठक असल्याचा निरोपदेखील पोहोचला नाही, ही बाबदेखील महत्त्वाची आहे. दुसरीकडे खासदार हेमंत गोडसे व शिंदे गटाचे काही पदाधिकारी वगळता, शासनातील अधिकारी बैठकीला उपस्थित होते.

ना. दादा भुसे यांना या संदर्भात विचारले असता, आपल्याला बैठकीची कल्पना नसल्याचे त्यांनी सांगितले. यावरून नाशिकमध्ये शिंदे गटात नाराजी असल्याचे स्पष्ट झाले आहे. यापूर्वीदेखील नांदगावचे आमदार सुहास कांदे यांनी स्वतंत्र पत्रकार परिषद घेत पालकमंत्री भुसे व खा. गोडसे यांच्या कार्यपद्धतीवर आरोप-प्रत्यारोप केले होते.

हेही वाचा :

Back to top button