नगर : जादूटोणा कराल, तर जेलची हवा! | पुढारी

नगर : जादूटोणा कराल, तर जेलची हवा!

नगर : पुढारी वृत्तसेवा : सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाकडून वेळोवेळी नागरिकांमध्ये जनजागृती केली जाते. तरीही नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा आपल्या परिसरात कुठे घडत असेल किंवा निदर्शनास आले असेल, तर तत्काळ जवळच्या पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात यावा, असे आवाहन समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त राधाकिसन देवढे यांनी केले आहे. भारतीय समाजात अज्ञानातून फोपावलेल्या काही अनिष्ठ, अघोरी, अमानुष संस्कारातून रुजलेल्या अनेक प्रकारच्या गैरसमजुतीमुळे समाजाचे अतोनात नुकसान होत आहे.

भूत उतरविण्याच्या बहाण्याने एखाद्या व्यक्तीला दोराने किंवा साखळीने बांधून ठेवून मारहाण करणे, काठीने किंवा चाबकाने मारणे, मिरचीची धुरी देणे, त्या व्यक्तीला छताला टांगणे, व्यक्तीच्या शरीरावर किंवा अवयवांवर तापलेल्या वस्तूचे चटके देऊन इजा पोहचविणे, इत्यादी अघोरी कृती करणे, तसेच नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांचा प्रचार करणे, किंवा ते प्रसिद्ध करणे, अशा अपराधासाठी दोषी असलेली व्यक्ती दोष सिद्ध झाल्यानंतर 6 महिने कारावास व पाच हजार रुपये दंड तसेच 7 वर्षे कारावास व 50 हजार रुपये दंड असून सदर शिक्षापात्र अपराध हे दखलपात्र व अजामीनपात्र असतील, अशी तरतूद महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत अधिनियमात करण्यात आलेली आहे.

प्रत्येक तालुक्यात दक्षता अधिकारी !

अपराध जर एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत घडल्यास किंवा निदर्शनास आल्यास सदर बाबतीत गुन्हा नोंदविण्यासाठी प्रत्येक तालुक्यात दक्षता अधिकारी यांची नेमक रण्यात आलेली आहे. सदर दक्षता अधिकारी हा संबंधित पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक हे असतील, त्यांना स्वतः तक्रार दाखल करून घेण्याचे अधिकारी देण्यात आलेले आहेत.

Back to top button