निवडणुकांचा रणसंग्राम : 196 ग्रामपंचायतींसाठी आज निघणार अधिसूचना | पुढारी

निवडणुकांचा रणसंग्राम : 196 ग्रामपंचायतींसाठी आज निघणार अधिसूचना

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यातील 196 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी शुक्रवारी (दि. 18) तालुकास्तरावर अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे. निवडणुकीत 28 नोव्हेंबरपासून नामनिर्देशन अर्ज दाखल करता येतील. जनतेमधून थेट सरपंच निवडला जाणार असल्याने निवडणुकांना अधिक महत्त्व आले आहे.

राज्यात ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणार्‍या तसेच नव्याने स्थापन झालेल्या सात हजार 751 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम गेल्या आठवड्यात आयोगाने घोषित केला. या ग्रामपंचायतींमध्ये जिल्ह्यातील 14 तालुक्यांमधील 196 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या सर्व ठिकाणी निवडणूक अधिसूचना शुक्रवारी (दि. 18) तहसीलदार स्तरावर जाहीर केल्या जातील. निवडणूक कार्यक्रमानुसार उमेदवारांना 28 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर या काळात उमेदवारी अर्ज भरता येतील, तर 5 डिसेंबरला अर्ज छाननी व 7 तारखेला दुपारी 3 पर्यंत माघारीची मुदत आहे. माघारीनंतर लगेचच रिंगणातील अंतिम उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप केले जाईल. तसेच 18 डिसेंबरला मतदान व 20 डिसेंबरला मतमोजणीची प्रक्रिया होणार आहे. दरम्यान, जिल्ह्यात तीन महिन्यांत दोन टप्प्यांत ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या. यांत सर्वच पक्षांना कमी-अधिक प्रमाणात यश मिळाल्याने त्यांचा हुरूप वाढला आहे. तिसर्‍या टप्प्यात 196 पैकी जास्तीत जास्त ग्रामपंचायतींवर सत्ता काबीज करण्यासाठी पक्षांनी आतापासूनच रणनीती आखायला सुरुवात केली आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांकडून उमेदवारी करण्यासाठी इच्छुकांमध्ये चढाओढ लागली आहे.

हेही वाचा:

Back to top button