

नवी दिल्ली : कॉम्प्युटर आणि स्मार्टफोनची हानिकारक किरणे आपल्या डोळ्यांना इजा करत असतात. स्क्रीनकडे जास्त वेळ पाहिल्यास त्याचा थेट परिणाम आपल्या डोळ्यांवर होतो. त्यामुळे डोळ्यात जळजळ, वेदना, सूज, डोळे लाल होणे, डोकेदुखी अशा अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. जर एखादी व्यक्ती दोन तासांपेक्षा जास्त वेळ संगणक किंवा डिजिटल स्क्रीन वापरत असेल तर त्याला 'कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम' होण्याची अधिक शक्यता असते. या समस्येपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी काय करावे त्याविषयी जाणून घेऊया.
एका संकेतस्थळाच्या माहितीनुसार, जेव्हा तुम्ही कॉम्प्युटर स्क्रीनसमोर काम करता तेव्हा अँटी-ग्लेअर ग्लासेस वापरावे, ते तुमच्या डोळ्यांना हानिकारक किरणांपासून वाचवते आणि तुमच्या डोळ्यांचेही संरक्षण करते. ऑफिसमध्ये काम करताना आपण अनेकदा चुकीच्या पद्धतीने बसतो, जे शरीरासाठी अत्यंत हानिकारक असते. काम करताना किंवा अगदी चित्रपट पाहतानाही आपली पोजिशन योग्य ठेवली पाहिजे.
जेव्हा तुम्ही कोणतेही काम सतत करायला सुरुवात करता तेव्हा त्याचा थेट परिणाम तुमच्या डोळ्यांवर होतो, म्हणूनच दर 20 मिनिटांनी तुम्ही 20 फूट दूर असलेल्या कोणत्याही वस्तूकडे पाहावे, असे किमान 20 सेकंद केल्याने तुमच्या डोळ्यांचा एक्सपोजर कमी होतो. अनेकदा काम करताना आपण कॉम्प्युटर आणि स्मार्ट फोनच्या स्क्रीनकडे किती जवळून पाहत आहोत, हे विसरून जातो, त्यामुळे डोळ्यांना फार त्रास होतो. त्यामुळे काम करताना कॉम्प्युटर स्क्रीन चेहर्यापासून 20 ते 25 इंच दूर राहावी याची काळजी घेतली पाहिजे. सतत दोन तास कॉम्प्युटर स्क्रीनसमोर काम करत असाल तर किमान 15 ते 20 मिनिटे डोळ्यांना विश्रांती द्यावी जेणेकरून तुमच्या डोळ्यातील ओलावा कायम राहील.