पिंपळनेर : घरे रिकामे करण्याच्या कारणावरुन सामोडे चौफुलीवर नागरिकांचा ठिय्या | पुढारी

पिंपळनेर : घरे रिकामे करण्याच्या कारणावरुन सामोडे चौफुलीवर नागरिकांचा ठिय्या

पिंपळनेर,(ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा

पिंपळनेर शहरासाठी सामोडे ग्रामपंचायतीच्या हद्दीत नवीन अपर तहसील कार्यालयाची इमारत मंजूर झाली आहे. या प्रस्तावित अपर तहसील कार्यालयाच्या जागेवर काहींनी घरे बांधली असून ही जागा १० दिवसांच्या आत रिकामी करावी. अशा नोटीस साक्री तहसील कार्यालयाच्या आदेशाने सामोडे ग्रामपंचायतीने संबंधित रहिवाशांना दिल्या आहेत. त्यामुळे महसूल विभाग व सामोडे ग्रामपंचायतीच्या विरोधात संतप्त नागरिकांनी सामेवारी, दि.13 दुपारी सामोडे चौफुलीवर ठिय्या मांडत रोष व्यक्त केला. अखेर सहायक पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे यांनी संतप्त नागरिकांची समजूत काढल्यानंतर नागरिक घरी परतले.

शहरासाठी नवीन अपर तहसील कार्यालयाची इमारत व्हावी. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने यापूर्वी १९ कोटी १३ लाखांचा मध्यवर्ती प्रशासकीय इमारत बांधकाम प्रस्ताव तयार करून तो जिल्हाधिकाऱ्यांकडे मंजुरीसाठी पाठवला होता. आता अपर तहसील कार्यालयाची इमारत मंजूर झाली असून त्यासाठी सुमारे साडेचार कोटी रुपये मंजूर झाले असल्याचे समजते. यापूर्वी माजी मंत्री जयकुमार रावल, माजी आमदार डी. एस. अहिरे यांच्या प्रयत्नाने पिंपळनेर येथील अपर तहसील कार्यालयाची स्थापना होऊ शकली. त्यामुळे अनेक नागरिकांचे काम शहरात होऊ लागले आहे. या कार्यालयामुळे पश्चिम पट्यातील आदिवासी बांधवांचाही वेळ, श्रम, पैसा वाचला. या कार्यालयाची गरज या शहराला होती. अपर तहसील कार्यालयाची सध्या जुन्या सरकारी दवाखान्यातून कामकाज सुरू आहे. तर जुन्या सरकारी रुग्णालयाच्या इमारतीची तत्कालीन अपर तहसीलदार विनायक थविल यांनी रंगरंगोटी, दुरुस्ती करून विभागवार सुंदर कक्ष स्थापन करून शासकीय सेवा नागरिकांना उपलब्ध करून दिल्या. परंतु तहसील कार्यालयाची हक्काची जागा पिंपळनेर पोलीस ठाण्याजवळ असून या जागेवर अनेक दिवसांपासून काही नागरिक (अतिक्रमण) वस्ती करुन रहात आहेत. हि जागा महावितरण, पाटबंधारे व महसूल अशा तीन विभागांची आहे. सदर जागेवर सार्वजनिक बांधकाम विभाग धुळे व उपविभाग पिंपळनेर यांच्याकडून संयुक्तरित्या पिंपळनेर शहरासाठी मध्यवर्ती अशा प्रशासकीय नवीन तहसील कार्यालय इमारत बांधकामाचा प्रस्ताव जानेवारी २०१८ मध्ये तयार करून तो प्रांताधिकारी कार्यालयाकडे पाठविला असून त्याला मंजुरी देखील मिळाली आहे.

आमदारांची घेतली भेट
अतिक्रमण करणाऱ्या नागरिकांनी आमदार मंजुळा गावित यांची भेट घेऊन त्यांच्या समोर समस्या मांडली.

५ हेक्टर ७६ आर ही जागा तहसीलसाठी राखीव
पिंपळनेर पैकी सामोडे शिवारातील राखीव जागा ५ हेक्टर ७६ आर ही जागा तहसीलसाठी राखीव आहे. ही जागा सामोडे ग्रामपंचायतीच्या हद्दीत असून, येथेच नवीन कार्यालयाची इमारत प्रस्तावित आहे. मात्र,या जागेवर ४७७ रहिवासी नागरिक राहत आहे. आता इमारतीसाठी निधी मंजूर झाल्याने लवकरच या ठिकाणी बांधकाम सुरू होईल. मात्र, या जागेवर काहींनी घरे बांधल्याने, साक्री तहसील कार्यालयाच्या आदेशान्वये सामोडे ग्रामपंचायतीने संबंधित नागरिकांनी दहा दिवसांच्या आत जागा खाली करावी,अशा आशयाची नोटीस एका ठिकाणी लावली असून, त्यात ४७७ रहिवाशांची नावे आहेत.

४७७ जणांना बेघर व्हावे लागणार
या ४७७ जणांना बेघर व्हावे लागणार असल्याने, संतप्त रहिवाशांनी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास एकत्र येत सामोडे चौफुली रस्त्यावर बसून आंदोलन करण्याचा प्रयत्न केला.सहायक पोलीस निरीक्षक सचिन साळुक योनी महिला नागरिकांना समजविण्याचा प्रयत्न केला.पण,महिला ऐकत नसल्याने काही वेळ तणाव निर्माण झाला होता.सहायक पोलीस निरीक्षक साळुंके यांनी पोलीस ठाणे परिसरात जाऊन चर्चेतून मार्ग काढू असे सांगितल्याने महिला नागरिक पोलीस ठाण्यात गेले.त्या ठिकाणी साळुंके यांनी आंदोलनकर्त्यांची समजूत काढल्याने वादावर पडदा पडला.

रस्त्यावर बसून किंवा उभे राहून असे आंदोलन करू नका, लोकप्रतिनिधींना निवेदन देऊन त्याच्याकडे मागणी करा. कायदा हातात घेऊ नका. यावर शांततेने चर्चा होऊ शकते अशी आंदोलकाची समजूत काढलेली आहे. – सचिन साळुंके, सहायक पोलीस निरीक्षक, पिंपळनेर पो.ठाणे.

हेही वाचा:

Back to top button